उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील गावात एक विचित्र प्रकार घडला आहे. ७५ वर्षांच्या संग्रुराम नावाच्या इसमाने वर्षानुवर्षे एकांतवासात घालवल्यानंतर जोडीदाराच्या आशेने त्याच्या वयाहून अर्ध्या वयाच्या महिलेशी लग्न केले. मात्र त्याचे सहवासाचे स्वप्न अधुरेच राहिले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी संग्रुरामच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कुटुंबाने या लग्नाला विरोध केला होता. तरीही त्यांनी २९ सप्टेंबर रोजी जलालपूरमधील ३५ वर्षीय मानभावतीशी लग्न केले. जोडप्याने न्यायालयात लग्नाची नोंदणी केली आणि नंतर स्थानिक मंदिरात पारंपरिक विधीनुसार लग्न केले.

लग्नानंतर समारंभात बोलत असताना मानभवती यांनी सांगितले की, संग्रुराम यांनी मला घर सांभाळण्याची जबाबदारी दिली. तसेच आमच्या होणाऱ्या मुलांची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. आम्ही लग्नाच्या रात्री बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी संग्रुराम यांची प्रकृती ढासळली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संग्रुराम यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. काहींनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे म्हटले तर काहींनी यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला.

संग्रुरामच्या दिल्ली येथे राहणाऱ्या पुतण्याने अंत्यसंस्कार काही काळ स्थगित केले आहे. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.