Brain Eating Amoeba निपाह व्हायरसनंतर आता केरळमध्ये ब्रेन इटिंग अमीबा पाय पसरु लागला आहे. केरळमध्ये या आजारामुळे एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन रुग्ण या आजारामुळे संक्रमित झाले आहेत. उत्तर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात अमीबिक इंसेपेलाइटिस च्या संक्रमणामुळे नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. १३ ऑगस्टला या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्टच्या दिवशी या मुलीला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याच दिवशी ब्रेन इटिंग अमीबा मुळे या मुलीचा मृत्यू झाला.

ब्रेन इटिंग अमीबामुळेच मृत्यू झाल्याची माहिती कशी मिळाली?

मेडिकल महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये शुक्रवारी रात्री जेव्हा नऊ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण शोधण्यात आलं तेव्हा त्यामागे अमीबिक इंसेफेलाइटिस हे कारण आढळलं. हा संसर्ग घातक असतो. या संक्रमाणालाच ब्रेन इटिंग अमीबा असं म्हटलं जातं. ब्रेन इटिंग अमीबाचा संसर्ग झालेले आणखी दोन रुग्ण केरळमध्ये आहेत. या घटनेत ९ वर्षांच्या मुलीचा मृ्त्यू झाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सगळ्यांनाच सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

काय आहे ब्रेन इटिंग अमीबा?

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेन इटिंग अमीबा हा मेंदूला ग्रासणारा आजार आहे. या आजाराला अमीबिक इंसेफेलाइटिस असंही म्हटलं जातं.

अमीबिक इंसेफेलाइटिस हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या अमीबा संसर्गामुळे होतो. मेंदूतील पेशींना खाण्याचं काम हा अमीबा करतो. त्यामुळे मेंदूला सूज येते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

ब्रेन इटिंग अमीबा हा तसा दुर्मीळ आजार आहे. पण हा आजार लहान मुलं, किशोरवयीन मुलं, तरुण आणि वयोवृद्ध या सगळ्यांना होऊ शकतो. दुषित पाणी नाकावाटे शरीरात प्रवेश करतं तेव्हा मेंदूला या आजाराने ग्रासण्याचा सर्वाधिक धोका असतो.

ब्रेन इटिंग अमीबाची लक्षणं काय आहेत?

१) ब्रेन इटिंग अमीबाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार याची लक्षणं म्हणजे सुरुवातीला फ्लू या आजाराप्रमाणे लक्षणं दिसून येतात. ताप येणं, डोकं दुखणं, उलटी होणं ही लक्षणं दिसू लागतात.

२) यानंतर मान अवघडणं, भ्रम होणं, भास होणं, रुग्ण कोमामध्ये जाणं अशीही लक्षणं दिसतात.

३) संसर्ग झाल्याच्या पाचव्या दिवसापासून ते अठराव्या दिवसापर्यंत हा संसर्ग त्याचे घातक परिणाम दाखवतो.

४) या आजारात मेंदूला सूज आल्याने भास होणं, शरीराचा तोल जाणं या समस्याही जाणवतात.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या आजारापासून बचाव करायचा असेल तर लहान मुलांना शक्यतो तलाव किंवा डबक्यात अंघोळ करण्यापासून रोखा. स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कमध्ये पाठवत असाल तर तिथलं पाणी स्वच्छ ठेवलं जातं आहे ना? याची खात्री करुन घ्या. दूषित पाण्यापासून बचाव करा. कारण दूषित पाण्यामुळे या रोगाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.