उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील खुटार पोलीस ठाणे क्षेत्रात झालेल्या भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी आहेत. शनिवारी रात्री उशिरा डंपर बसवर उलटल्याने हा अपघात झाला. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमधून जवळपास ७० भाविक प्रवासी बसमधून प्रवास करत होते. ही बस सीतापूरहून उत्तराखंड पूर्णगिरीला जात होती. बस एका ढाब्यावर जेवणासाठी थांबली असताना हा अपघात घडला. दगडांनी भरलेल्या एका वेगवान डंपरचा तोल सुटला आणि तो डंपर थेट बसवर येऊन उलटला. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी ट्रकखाली चिरडले गेले, यातच ११ जणांचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी बचावकार्य करत जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. तसंच, गुन्हाही दाखल केला आहे.
VIDEO | 11 died and several got injured as an overloaded truck rammed a bus carrying pilgrims in UP’s Shahjahanpur. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2024
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/vSgVHKZA3E
सुमारे तीन तास चाललेल्या बचावकार्यानंतर डंपरखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले. ट्रकखाली चिरडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी, भंगार हलवण्यासाठी बचाव पथकांनी क्रेनचा वापर केला.
“आम्हाला रात्री साडेअकराच्या सुमारास माहिती मिळाली की गोला बायपास रोडवर दगडाने भरलेला डंपर एका ढाब्याजवळ उभ्या असलेल्या प्रवासी बसवर उलटला. यावेळी काहीजण ढाब्यावर जेवण करत होते, तर काही बसमध्ये बसले होते. यात ११ जणांचा मृ्त्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. आता सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पीडितांच्या कुटुंबीयांना याबाब त माहिती देत आहोत”, असं साहजहांपूरचे पोलीस अधिक्षक अशोक कुमार मीना यांनी इंडिया टुडेला सांगितलं.