एपी, लंडन : रशियाने आपण ‘काळा समुद्र धान्य कार्यक्रम’ (ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह) करारातून माघार घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली, आपल्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर रशिया पुन्हा हा करार सुरू ठेवेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. करारातील रशियाशी संबंधित भागाची अंमलबजावणी होईल तेव्हा रशिया पुन्हा एकदा या कराराची अंमलबजावणी सुरू करेल, असे पेस्कोव्ह यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रे आणि तुर्कीने या करारासाठी मध्यस्थी केली होती. या करारानुसार युद्धकाळातही युक्रेनमधून धान्याची निर्यात करणे शक्य झाले होते. विशेषत: धान्याचा तुटवटा असलेल्या आफ्रिका, मध्य आशिया आणि आशियाई देशांना युक्रेनमधून धान्याची निर्यात केली जात होती. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, सातू, सूर्यफुलाचे तेल आणि इतर अन्नपदार्थाचे महत्त्वाचे निर्यातदार आहेत. या दोन्ही देशांकडून निर्यात बंद झाल्यास जगभरात अन्नटंचाई, महागाई वाढण्याचा धोका आहे, तसेच अधिकाधिक लोक गरिबीमध्ये जाण्याची भीती आहे.

रशियाचा आक्षेप काय?

पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियातील अन्नधान्य आणि खतांची निर्यात करण्यासाठी एक स्वतंत्र करार करण्यात आला होता. मात्र, या कराराची अंमलबजावणी होत नाही आणि केवळ युक्रेनमधूनच धान्याची निर्यात केली जाते, अशी रशियाची तक्रार आहे.

रशिया-क्रिमिया जोडपुलावर स्फोट; रशियाचा युक्रेनवर आरोप

रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या एकमेव पुलावर स्फोट झाल्यामुळे त्यावरून होणारी वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली असून हा हल्ला युक्रेनच्या दोन ड्रोनने केल्याचा आरोप रशियाच्या वतीने करण्यात आला आहे. या पुलावरून रशियाची आवश्यक लष्करी वाहतूक होत असते. युक्रेनने या स्फोटाची उघडपणे जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली, मात्र अप्रत्यक्ष कबुली दिल्याचे मानले जात आहे.

केर्श पूल हा रशियाने क्रिमियावर ताबा मिळवल्याची महत्त्वाची खूण आहे. सोमवारी या पुलाच्या एका भागात स्फोट घडवण्यात आल्यानंतर त्यामध्ये एका विवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला आणि त्यांची मुलगी स्फोटात जखमी झाली. स्फोटानंतर १९ किमी लांबीच्या केर्श पुलावरून रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती, मात्र ती सहा तासांनंतर सुरू करण्यात आली.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून या पुलावर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका ट्रक बॉम्बने पुलाचे दोन भाग स्फोटामध्ये उडवले होते. वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या चित्रफितीमध्ये पुलाचा एक भाग वाकलेला दिसत आहे, मात्र त्याचा काही भाग तुटून पाण्यात पडला आहे की नाही ते स्पष्ट झाले नाही. या पुलाच्या नुकसानाची सखोल तपासणी केली जात असून त्यानंतरच हा पूल दुरुस्त होण्यास किती वेळ लागेल ते सांगता येईल असे रशियाच्या उपपंतप्रधानांनी सांगितले. 

युरोपमधील सर्वाधिक लांबीचा पूल

हा पूल बांधण्यासाठी ३६० कोटी डॉलर खर्च आला असून तो युरोपमधील सर्वात लांब पूल आहे. युक्रेनच्या दक्षिण भागामध्ये लष्करी कारवाया करण्यासाठी रशियाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A shock to global food security stop of grain contract from russia ysh