भरुच :गुजरातमधील भाजप सरकारने पेपरफुटींबाबतचा जागतिक विक्रम केला असल्याचे सांगतानाच, शाळा व रुग्णालयांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्याची टीका आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी रविवारी केली. यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ भाजपला पराभूत करेल असे सांगून त्यांनी सत्ताधारी पक्षाला आव्हान दिले.

भरुच जिल्ह्यातील वालिया याथे चंदेरिया खेडय़ात रविवारी झालेल्या एका आदिवासी मेळाव्याला केजरीवाल यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी छोटुभाई वसावा यांच्या भारतीय ट्रायबल पार्टीशी (बीटीपी) युतीची घोषणा केली आणि ‘आप’ ला सत्तेत आणण्यासाठी मतदान करून ‘भाजपची अरेरावी मोडून काढा’, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

राज्यात मुदतपूर्व निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान केजरीवाल यांनी भाजपला दिले.   ‘भाजप आम आदमी पक्षाला  घाबरला असल्यामुळे गुजरातच्या निवडणुका लवकर होतील असे मी ऐकले आहे. आम्ही दिल्लीत आणि अलीकडेच पंजाबमध्ये सरकार स्थापन केले आहे आणि आता गुजरातची वेळ आहे. त्यांना (भाजप) वाटते की आम्हाला डिसेंबपर्यंत वेळ मिळाल्यास गुजरात आपकडे वळेल. मात्र तुम्ही निवडणुका आता घ्या किंवा सहा महिन्यांनी, तुम्हाला हरवू’, असे केजरीवाल म्हणाले.