भारतीय वंशाच्या अमेरिकन आणि पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे इतिहासकार, लेखक, तत्त्वज्ञ, तज्ज्ञ, परीरक्षक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अव्वल विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत हे पदक स्वीकारणे राष्ट्रीय मानवतावादी संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष विलियम अॅडम्स यांनी दिली आहे. या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या लाहिरी यांनी आमची कल्पना शक्ती प्रकट केली तसेच आमच्या भावना स्पष्ट केल्या आहेत. मानवतावाद सामान्यांच्या भल्यासाठीच असल्याचे या पुरस्काराने स्पष्ट झाल्याचे अॅडम्स यांनी म्हटले आहे. पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
झुम्पा लाहिरी यांची राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड
लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
Written by रत्नाकर पवार

First published on: 05-09-2015 at 05:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acclaimed author jhumpa lahiri to be conferred top us award