हैदराबाद : राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तेलंगणा राज्याने धान उत्पादनात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी दिली. रंगारेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम् मंडलातील थुम्मलून गावात आयोजित केलेल्या मोठय़ा जाहीर सभेला संबोधित करताना राव यांनी तेलंगणाच्या विकासाबाबत माहिती दिली.

पूर्वी तेलंगणा धान उत्पादनात देशात १७ व्या क्रमांकावर होता. आता कालेश्वरम प्रकल्पामुळे तेलंगणा देशात बियाण्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक धान उत्पादन तेलंगणामध्ये होत आहे. हा प्रकल्प जनतेसाठी निश्चितच वरदान ठरला आणि कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फायदा झाला.
कालेश्वरम उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प गोदावरी खोऱ्यावर बांधला गेला आणि त्याचाही कृषी क्षेत्राला फायदा झाला, असे राव यांनी सांगितले. तेलंगणा प्रत्येक क्षेत्रात आणि मूलभूत सुविधांच्या तरतुदीत प्रथम क्रमांकावर आहे. प्रत्येक घराला पिण्याचे पाणी, दरडोई उत्पन्न आणि दरडोई वीजवापर या बाबतीत तेलंगणा राज्य अव्वल स्थानावर आहे, असे राव म्हणाले.