|| तुषार वैती
२५ मार्च १९९२ रोजी पाकिस्तानच्या पेशावरमधील निर्वासितांच्या छावण्यांशेजारी जोरदार बॉम्बहल्ले सुरू होते. जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचे रणशिंग फुंकले गेले की काय, असेच सर्वाना वाटत होते. पण पाकिस्तानने क्रिकेटचा विश्वचषकजिंकला, हे ऐकून या छावण्यांमध्ये आश्रय घेणाऱ्या अफगाणिस्तानच्या अनेक लहान मुलांची क्रिकेटविषयीची आवड वाढत गेली. तालिबानी राजवटीदरम्यान अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटसह अन्य खेळांवर बंदी असल्यामुळे पेशावरसारख्या ठिकाणीच अफगाणिस्तानच्या क्रिकेटची खरी मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू तालिबान्यांचा विरोध मावळत गेला आणि त्यांनी क्रिकेटवरील बंदी उठवल्यानंतर क्रिकेटचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या युवा क्रिकेटपटूंच्या आनंदाला पारावार उरला नाही.
राजकीय अस्थिरता, अशांत वातावरण, युद्धजन्य परिस्थिती आणि कोणत्याही क्षणी जीव गमवावा लागण्याच्या स्थितीचा सामना करतानाच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी कधीही हार न मानणे, कायम संघर्षांची वृत्ती अंगी बाणवत क्रिकेटचे कौशल्य आत्मसात केले आणि अनेक अडथळ्यांवर मात करत आपल्यातील झुंजार वृत्तीचे प्रदर्शन घडवले. गमावण्यासारखे काहीही नसताना क्रिकेटचे स्वप्न उराशी बाळगून ते लढले आणि त्याच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांची धडपड सुरू आहे.
१९९५मध्ये पाकिस्तानातच अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना करण्यात आली. क्रिकेटसाठी लागणाऱ्या कोणत्याही सोयीसुविधा आणि कुशल, निष्णात प्रशिक्षकांचा फौजफाटा नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडूनच मदत घेण्यात आली. २००१मध्ये राष्ट्रीय संघ तयार झाल्यानंतर त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांना संलग्न देशांचा दर्जा बहाल केला. त्यानंतर पायाभूत सोयीसुविधांचा अभाव, आर्थिक पाठबळाची कमतरता या सर्व गोष्टींवर मात करत अफगाणिस्तानने उत्तम प्रगती केली. २०११च्या विश्वचषकाची संधी थोडक्यात हुकल्यानंतर आजतागायत त्या इतिहासाची पुनरावृत्ती अफगाणिस्तानने केली नाही. २०१५ आणि २०१९च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा मान पटकावत अफगाणिस्तानने सर्वाचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. २०१५मध्ये सलग पाच सामने गमावल्यानंतर स्कॉटलंडला नमवून अफगाणिस्तानने विश्वचषकातील विजयाचे खाते खोलले. ‘‘कौशल्य, सांघिक कामगिरी आणि समर्पित वृत्ती यांचा उत्तम नमुना म्हणजे अफगाणिस्तानचा संघ,’’ अशा शब्दांत २०१०मध्ये अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन यांनी अफगाणिस्तानची स्तुती केली होती.
२०१६-१७मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद रजपूत यांना अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वाची छाप पाडण्यासाठी धडपडणाऱ्या या संघाला प्रशिक्षण देण्याची संधी रजपूत यांनी साधली. त्या वेळी त्यांचे अनेक मित्र गोंधळले. ‘‘तू तुझा वेळ वाया घालवायला निघाला आहेस का?’’ अशा शब्दांत मित्रांनी रजपूत यांची खिल्ली उडवली. पण रजपूत आपल्या निर्णयावर ठाम होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंची मेहनत घेण्याची तयारी आणि क्रिकेटविषयीची आवड पाहून ते सुरुवातीला स्तब्ध झाले. रजपूत यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानने विविध प्रकारांत १० पैकी ६ मालिका जिंकल्या. त्यात वेस्ट इंडिजसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला.
अवघ्या दीड दशकांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पाऊल टाकत अवघ्या काही वर्षांत जबरदस्त कामगिरी करत एकापाठोपाठ यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या अफगाणिस्तानकडून यंदाच्या विश्वचषकात अद्याप अपेक्षित अशी धक्कादायक विजयाची नोंद झाली नाही. मात्र कायम दहशतवादाच्या सावटाखाली असणाऱ्या अफगाणिस्तान संघातील वाद आता चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मोहम्मद शहझादला तंदुरुस्त असतानाही तंदुरुस्त नसल्याचे कारण देत इंग्लंडहून थेट मायदेशात पाठवण्यात आल्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची धमकी दिली आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानमधील हे वाद आणि अंतर्गत कुरबुरी त्यांच्या कामगिरीस मारक ठरत आहेत.
१६व्या शतकात क्रिकेटची पाळेमुळे गिरवणाऱ्या इंग्लंडला अद्याप विश्वचषकावरही नाव कोरता आले नाही. मात्र दीड-दोन दशकांच्या तपश्चर्येनंतर अफगाणिस्तानने थक्क करणारी प्रगती केली आहे. कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकणाऱ्या अफगाणिस्तानच्या जनतेला क्रिकेट या एकमेव खेळाने आनंद दिला आहे. अफगाणिस्तानचा संघ एके दिवशी नक्कीच विश्वचषक जिंकेल, असे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू समीउल्ला शेनवारी याचे स्वप्न आहे. मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर अफगाणिस्तानला आताच सर्व समस्यांपासून चार हात लांब रहावे लागेल.