Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. या घटनेला आता एक महिना होऊन गेला आहे. या अपघातानंतर ‘एअर इंडिया’च्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवालही समोर आला आहे. मात्र, या अहवालावरून बरेच वादळ उठवताना दिसत आहेत. जवळपास पावणेतीनशे जणांचा जीव या घटनेत गेला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विविध स्तरांवर सुरू असून बोइंग कंपनी, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयासह आदी स्तरातून या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. दरम्यान, या घटनेतील मृतांमध्ये विदेशातील नागरिकांचाही समावेश होता. या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडिया अपघातातील मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने या संदर्भातील दावा केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, यूकेमधील दोन कुटुंबांना चुकीच्या मृतदेहाचे अवशेष पाठवण्यात आल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमदाबादमधील एका सरकारी रुग्णालयाने सीलबंद शवपेट्यांमध्ये हे अवशेष पाठवले होते. या गोंधळात एअर इंडियाचा कोणताही सहभाग नव्हता. तसेच या संदर्भात भारत सरकारने सांगितलं होतं की, प्रोटोकॉलनुसार या घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी योग्य ती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.

दरम्यान, ब्रिटिश कुटुंबांना चुकीचे अवशेष मिळाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने केल्यामुळे आता गोंधळ उडाला आहे. दुर्घटनेतील मृतदेहाचे अवशेष चुकीच्या पद्धतीने ओळखले गेले आणि त्यांना युकेला नेण्यात आल्याचं कीस्टोन लॉच्या वकिलाने इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच लंडनमधील कोरोनरने मृतांच्या डीएनएशी जुळवून त्यांचे अवशेष पडताळण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप वकिलाने केला आहे.

अहमदाबाद विमान अपघात झाल्यानंतर डीएनएच्या माध्यमातून मृतदेहांची ओळख पटवत संबंधित कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आले होते. मात्र, मृतदेहांची ओळख पटवताना ब्रिटनमधील संबंधित दोन कुटुंबांना मृतदेह सोपवताना ही चूक झाल्याचा दावा आता करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, ब्रिटनमधील दोन कुटुंबांना मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांऐवजी चुकीच्या मृतदेहांचे अवयव पाठवण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

भारताने काय खुलासा केला?

अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमधील कुटुंबांना दुसऱ्यांचेच मृतदेह पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील यूकेच्या मीडियातील वृत्त समोर आल्यानंतर भारताने याबाबत खुलासा केला आहे. भारताने म्हटलं की, या घटनेबाबत ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातातील एकूण मृतांपैकी ५२ ब्रिटिश नागरिक होते. पण यातील दोन मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “भारतीय अधिकारी या मुद्द्यावर त्यांच्या ब्रिटनच्या समकक्षांसोबत काम करत आहेत. आम्ही हा अहवाल पाहिला आहे आणि याबाबतच्या मुद्यावर आम्ही ब्रिटनशी संपर्क साधत आहोत. या दुःखद अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्थापित प्रोटोकॉल आणि तांत्रिक आवश्यकतांनुसार मृतांची ओळख पटवली होती. सर्व मृतांच्या प्रतिष्ठेचा आदर करून हाताळण्यात आले. या समस्येशी संबंधित कोणत्याही चिंता दूर करण्यासाठी आम्ही यूके अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.”