Ahmedabad Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला त्यात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह होते. त्यांच्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून आश्चर्यकारक रित्या बचावलेले विश्वास कुमार हे अजूनही या अपघाताच्या धक्क्यातच आहेत. मानसिक बळ वाढवणारे उपचार ते घेत आहेत. विश्वास कुमार ११ A या सीटवरुन प्रवास करत होते. या सीटच्या जवळ एक्झिट गेट होतं त्यामुळे जेव्हा विमान कोसळलं तेव्हा ते एक्झिट गेटमधून बाहेर फेकले गेले आणि त्यामुळेच बचावले. १२ जूनला झालेल्या अपघाताच्या या धक्क्यातून विश्वास कुमार सावरलेले नाहीत.

नेमके काय उपचार घेत आहेत विश्वास कुमार?

विश्वास कुमार यांच्या मनावर १२ जूनला झालेल्या अपघाताचा प्रचंड मानसिक आघात झाला आहे. त्यामुळे ते अजूनही अपघाताच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. त्यासाठी ते मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेत आहेत अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. लंडन या ठिकाणी जाणारं बोईंग 787 हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांत कोसळलं. त्यावेळी ४० वर्षीय विश्वास हे एकमेव प्रवासी त्या भीषण अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचले. देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा त्यांची प्रत्यक्ष प्रत्ययच घेतला. या भीषण अपघातात त्यांचा भाऊ अजय यांचाही मृत्यू झाला.

विश्वास कुमार यांच्या भावाने नेमकं काय सांगितलं?

“विश्वास कुमार यांना तो दिवस आठवला की अजूनही मनात कुठेतरी भीती वाटते. भावाच्या मृत्यूचा त्यांच्या मनावर गहिरा परिणाम झाला आहे. विश्वास कुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. विश्वास यांच्या भावाने सांगितलं की आमचे बरेच नातेवाईक हे परदेशात राहातत. विश्वास यांच्याबाबत त्यांनी चौकशी केली. मात्र विश्वास यांना कुणाशीही बोलायचीही इच्छा नाही. कारण त्यांच्या मनावर जो मानसिक आघात झाला आहे त्यातून ते पूर्णपणे सावरलेले नाहीत. अजूनही झोपेतून विश्वास अचानक दचकून उठून बसतात. त्यानंतर हळूहळू त्यांना झोप लागते. सध्या मानसोपचार तज्ज्ञांकडून ते उपचार घेत आहेत. लंडनला परतण्याचा त्यांनी अद्याप कुठलाही विचार केलेला नाही” असं विश्वास यांचा भाऊ सनी याने सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

१२ जूनच्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या विश्वास बचावले

१२ जूनला त्यांना अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच १७ जूनला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या भावाच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्यानंतर मृतदेहाचे अवशेष त्यांच्या कुटुंबाला देण्यात आले होते. विश्वास आणि अजय हे दोघंही भाऊ एअर इंडियाच्या त्या विमानाने लंडनला परतत होते. मात्र १२ जूनला विमानाने उड्डाण करताच अपघात झाला. ज्यातून फक्त विश्वास वाचू शकले.