‘एम्स’मधील एका महिला डॉक्टरने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अखिल भारतीय आयुर्विद्यान संस्थेमध्ये (एम्स) कार्यरत असलेल्या डॉक्टर प्रियाचा मृतदेह दिल्लीच्या पहाडगंज परिसरातील नबीकरीम येथील एका हॉटेलमध्ये संशयित अवस्थेत आढळून आला. पती आणि सासरकडील लोकांबाबतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख करणारे पत्र तिने मृत्यूपूर्वी लिहिल्याचे समजते.
रविवारी सकाळी नबीकरीम येथील एका हॉटेलमधील ३०२ क्रमांकाच्या खोलीत ‘एम्स’च्या अॅनेस्थेशिया विभागात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय डॉक्टर प्रियाचा मृतदेह आढळून आला. एम्समध्येच कामाला असलेल्या डॉक्टर कमल या ३५ वर्षीय तरुणाशी २०१० मध्ये तिचे लग्न झाले होते. शनिवारी दुपारी पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर प्रिया या हॉटेलमध्ये राहायला आल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले. तिच्या हाताच्या नसा कापलेल्या होत्या आणि मृतदेहाजवळच एक पत्र सापडले. प्रियाने पहाटे दोन वाजता आपल्या हाताच्या नसा कापल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तविण्यात आला आहे. जयपूरचा आपला ड्रायव्हिंग परवाना प्रियाने ओळखपत्र म्हणून हॉटेलमध्ये सादर केला होते. मृत्यूपूर्वी स्वत:च्या फेसबूक पेजवर तिने छळवणुकीबाबत केलेल्या उल्लेखावरून प्रियाचे पतीबरोबर पटत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. त्याचप्रमाणे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी डॉक्टर कमल यास हुंडाबळी प्रकरणी अटक केली आहे. तसेच कमलच्या समलिंगी संबंधांमुळे (गे) त्रस्त असलेल्या प्रियाला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कौटुंबिक छळवणुकीच्या अनुषंगानेदेखील पोलीस तपास करत आहेत.
प्रियाचा पती डॉक्टर कमल ‘गे’ असून त्याचे अनेक पुरुषांशी संबंध आहेत. हा प्रकार प्रियाला समजल्याने ती मानसिक तणावात राहू लागली. याचवेळी पतीने तिला छळण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये कायम भांडणे होत होती, असा आरोप प्रियाच्या माहेरकडील लोकांनी केला आहे. १५ दिवसांपूर्वीदेखील प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याची माहिती प्रियाने आपल्याला दिली नसल्याचे प्रियाकडील लोकांनी सांगितले. प्रियाच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर कमलला अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
प्रियाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील माहितीच्या आधारेदेखील पोलीस तपास करत आहेत. प्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पतीशी पटत नसल्याने प्रियाने आत्महत्या केली अथवा तिच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘गे’ पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
'एम्स'मधील एका महिला डॉक्टरने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
First published on: 20-04-2015 at 03:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiims doctor suicide after blaming gay husband of cruelty on facebook