Air India Flight Landing : अमृतसरहून बर्मिंगहॅमकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर ७८७-८ विमान शनिवारी यूकेमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. उतरवण्यापूर्वी विमानाचं एअर टर्बाइन म्हणजेच रॅम एअर टर्बाईन (Ram Air Turbine) आपोआप हवेतच सक्रिय झाल्यानंतर त्याचे लँडिंग करण्यात आलं. एआय११७ (AI117) या विमानाबरोबर ही घटना बर्मिंगहॅम विमानतळावर उतरताना घडली.
विमानातील रॅम एअर टर्बाइन (RAT) प्रणाली हे एक लहान पंख्यासारखे उपकरण आहे आणि विमानाची पॉवर जाते तेव्हा ही आपोआप सुरू होते.साधारणपणे जेव्हा विमानाचे सर्व इंजिने काम करणे बंद करतात, तेव्हा ही प्रणाली आपोआप कार्यान्वित होते हा पंखा आत येत असलेल्या वाऱ्याचा उपयोग करून आपत्कालीन पॉवर तयार करतात.
विशेष बाब म्हणजे, याच मॉडेलचे बोईंग ड्रीमलाइनर ७८७-८ विमानाचा जून महिन्यात अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला होता, ज्यात RAT (Ram Air Turbine) यंत्रणा देखील कार्यान्वित झाली होती. त्या घटनेच्या अंतरिम तपास अहवालात आढळून आले होते की, इंधन पुरवठा खंडित झाल्यामुळे विमानाचे इंजिन बंद पडले आणि त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा (RAT) कार्यान्वित झाली.
विमान कंपनीचे स्पष्टीकरण
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “४ ऑक्टोबर रोजी अमृतसरहून बर्मिंगहॅमकडे जाणारे विमान एआय११७ मधील ऑपरेटिंग क्रूला विमान उतरण्यापूर्वी विमानाचे रॅम एअर टर्बाइन (RAT) सुरू झाल्याचे आढळून आले. सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामीटर्स सामान्य असल्याचे आढळून आले आणि विमानाने बर्मिंगहॅममध्ये सुरक्षितपणे लँडिंग केली. पुढील तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले आहे आणि त्यामुळे एआय११४ बर्मिंगहॅम ते दिल्ली विमान रद्द करण्यात आले आहे आणि प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. एअर इंडियासाठी प्रवासी आणि क्रूची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
विमान कंपनीने स्पष्ट केली की, विमान उतरल्यानंतर सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक सिस्टीम्स सामान्यपणे कार्यरत होत्या. तरीही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, विमानाची सखोल तपासणी करण्यासाठी ते ग्राउंड करण्यात आले आहे.