Air India finds no issues in fuel control switches on Boeing 787 planes : गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला गेल्या महिन्यात भीषण अपघात झाला होता. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सध्या विमानांची सखोल तपासणी केली जात आहे. विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर ‘विमान कंपन्यांनी २१ जुलै पर्यंत त्यांच्या ‘बोइंग-७८७’ आणि ‘७३७’ या विमानांचे इंधन नियंत्रक स्विच तपासून घ्यावेत,’ असे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले होते.
यानंतर एअर इंडियाने त्यांच्या सर्व बोइंग ७८७-८ या विमानामधील इंधन नियंत्रक स्विच (एफएससी) च्या लॉकिंग मेकॅनिझमची तपासणी पूर्ण केली आहे, आणि त्यांना यामध्ये कोणतीही समस्या आढळली नसल्याचे एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगशव ब्युरो (AIIB) च्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, बोइंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या अहमदाबाद येथील अपघातावेळी टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच एका सेकंदाच्या अंतराने एका पाठोपाठ एक दोन्ही इंजिनचे इंधन पुरवठा स्विच हे कट ऑफ स्थितीत हलवण्यात आले होते. यानंतर या स्विचेसचा मुद्दा चर्चेत आला होता.
“बोइंग मेंटनन्स शेड्यूलप्रमाणे आमच्या सर्व बोइंग ७८७-८ विमानांचे थ्रॉटल कंट्रोल मोड्यूल (TCM) रिप्लेसमेंट करण्यात आले. एफसीएस हा या मॉड्यूलचा भाग आहे,” असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“आठवड्याच्या शेवटी आमच्या इंजिनिअरिंग पथाकाने आमच्याकडील सर्व बोइंग ७८७ विमानांच्या एफसीएसच्या लॉकिंग मेकॅनिझमची खबरदारीची तपासणी सुरू केली. सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहे आणि कोणतीही समस्या आढळून आलेली नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी एअर इंडिया एक्सप्रेसची जवळपास संपूर्ण बोइंग ७३७ मॅक्स फ्लीट देखील तपासण्यात आली आणि यामध्ये कोणतीही समस्या आढळली नाही असेही अधिकाऱ्याने यावेळी नमूद केले.
अमेरिकेच्या नागरी उड्डाण प्रशासनाने २०१८ मध्ये इंधनपुरवठा नियंत्रित करण्याच्या स्विचचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात ‘बोइंग’च्या ७८७ आणि ७३७ या प्रकारच्या विमानांचाही समावेश होता. ‘विशेष हवाई योग्यता माहिती बुलेटिन’मध्ये (एसएआयबी) त्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र कुठलेही निर्देश तेव्हा दिले गेले नव्हते.
‘इंधन नियंत्रक स्विच’चा काय उपयोग?
विमानातील इंधन नियंत्रक स्विच इंजिनला होणारा इंधनपुरवठा नियंत्रित करतात. बोइंग विमानाच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला. विमान अपघात चौकशी विभागाने (एएआयबी) सांगितले, ‘विमानाच्या दोन्ही इंजिनना होणारा इंधनपुरवठा एका सेकंदाच्या अंतरात थांबला होता. त्यामुळे विमानाच्या कॉकपिटमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कॉकपिटमध्ये एक वैमानिक दुसऱ्याला इंधनपुरवठा तुटल्यासंबंधी विचारत होता आणि दुसरा मी ते केले नाही, असे सांगता होता. असे रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत आहे.’