इंडोनेशियाहून १६२ प्रवाशांना घेऊन सिंगापूरकडे निघालेल्या ‘एअर आशिया’चे ‘क्यूझेड-८५०१’ या विमानाला जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उड्डाणानंतर अवघ्या ४५ मिनिटांत बेपत्ता झालेल्या विमानाच्या शोधासाठी बहुराष्ट्रीय शोधकार्य सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या पथकांनी जावा समुद्रानजीक घेतलेल्या शोधकार्यात विमानाचे ‘तेलतवंग असलेले अवशेष’ आढळले आहेत; ते बेपत्ता झालेल्या विमानाचेच असतील असा कोणताही पुरावा अद्याप तरी पथकांच्या हाती लागलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेलिकॉप्टरच्या साहाय्याने विमानाचा शोध घेतला जात आहे. शोध पथकाला नांगका बेटाजवळ संशयास्पद वस्तू आढळल्या. हे ठिकाण विमानाचा संपर्क तुटल्याच्या ठिकाणापासून १००० कि.मी. दूर आहे.
दरम्यान, इंडोनेशियाचे उपाध्यक्ष जुसूफ कल्ला यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या विमानाने शोधलेले पदार्थ हे त्या बेपत्ता विमानाचे नाहीत. ते तपासण्यात आले असून तसे कुठलेही पुरावे नसल्याचे सांगण्यात आले.
इंडोनेशिया हवाई दलाचे प्रवक्ते एअरमार्शल हाडी ताजहानटो यांनी मेट्रो टीव्हीला सांगितले की, इंडोनेशियाच्या हेलिकॉप्टरला जावा समुद्रात बेलिटुंगच्या पूर्वेला तेलकट भाग दिसले आहेत. पण त्याचाही संबंध बेपत्ता विमानाशी असल्याचे सिद्ध झालेले नाही.
विमानाच्या शोधासाठी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांचे मिळून एक संयुक्त पथक करण्यात येईल. येत्या काही दिवसांत शोधकार्य अधिक व्यापक करण्यात येईल. सध्या जे अवशेष आढळले आहेत, ते कोणताही निष्कर्ष काढण्यास पुरेसे नाहीत. आमच्या पथकांना सध्या येथील ढगाळ वातावरणाचा मुकाबला करावा लागत आहे. परंतु ज्या भागांत आकाश निरभ्र राहील, त्या भागांतून शोधकार्यास पुढे सुरू ठेवण्यात येईल. मंगळवापर्यंत शोधकार्यात काहीतरी हाती लागेल, अशी अपेक्षा जाकार्ता हवाई दलाचे कमांडर रीअर मार्शल द्वि पुतरान्टो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अन्य विमानामुळे उंच उड्डाण रोखले
एअरबस ए ३२०-२०० हे विमान उड्डाणानंतर तासाभरात बेपत्ता झाले व त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. वैमानिकाने खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याची परवानगी मागितली होती व विमान उंचावर नेले होते. विमान समुद्राच्या तळाला गेले असेल तर ते वर आणण्याची साधनसामग्री नाही असे सोलिस्टो यांनी सांगितले. वैमानिकाने उंची ३२ हजार फुटांवरून ३८ हजार फूट केली होती, त्याला मार्ग बदलण्यास लगेच परवानगी दिली नव्हती कारण त्या उंचीवर आणखी एक विमान होते. विमानाने धोक्याचा संदेश पाठवला नव्हता.
२०१४ वर्ष भोवले
इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांना २०१४ हे वर्ष भोवले आहे. मलेशियाची तीन विमाने दुर्घटनेत गायब झाली आहेत.