अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जुलै महिन्यात अंतराळ प्रवास करणार आहेत. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली होती. या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ दर्शन घडवण्यात येणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये ते असणार आहेत. जेफ बेजोसने आपल्या स्पेसक्राफ्टला एनएस-१४ नाव दिलं आहे. या स्पेस क्राफ्टचं चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जेफ बेजोस अंतराळात जाणारे पहिले श्रीमंत व्यक्ती असतील. अॅमेझॉनचे कार्यकारी अधिकारी पद सोडल्यानंतर १५ दिवसांनी ते अंतराळात जाणार आहेत. जेफ बेजोस ५ जुलैला आपलं कार्यकारी अधिकारी पद सोडणार आहेत.
कंपनीने लाँच चाचणीदरम्यान नव्या बूस्टर आणि अपग्रेड केलेल्या कॅप्सूलचं परीक्षण केलं होतं. या अपग्रेडेड वर्जनमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा तपासल्या गेल्या. या स्पेसक्राफ्टमध्ये पुश-टू-टॉक सिस्टम, प्रत्येक सीटवर नवीन क्रू अलर्ट सिस्टम, कॅप्सुलमध्ये आवाज कमी करण्यासाठी कुशन लाइनिंग, थंडावा आणि आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे. न्यू शेपर्ड पूर्णत: ऑटोनॉमस सिस्टम आहे. या प्रवासात जेफ बेजोस आपल्या भावासह अंतराळात जाणार आहेत. “मी पाच वर्षांचा असल्यापासून अंतराळात प्रवास करण्याचं स्वप्न पाहत होतो. आता २० जुलैला मी माझ्या भावासह हा प्रवास करणार आहे. माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत रोमांचकारी प्रवास असणार आहे” अंस त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहीलं आहे. या स्पेसक्राफ्टमधून प्रवास ११ मिनिटांचा असणार आहे. या दरम्यान स्पेसक्राफ्ट १०० किलोमीटर उंचीवर असणार आहे.
या स्पेसक्राफ्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकूण ४ दिवसांचा अनुभव मिळणार आहे. यात ३ दिवसांचं प्री-फ्लाईट प्रशिक्षण असणार आहे. कंपनीच्या लॉन्च साइट टेक्सासच्या वेन हॉर्नमध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणावेळी जेवणासह सर्व सुविधा ब्ल्यू ओरिजिनकडून करण्यात येणार आहेत. स्पेसक्राफ्टमधील एका जागेची विक्री लिलावाद्वारे करण्यात येणार आहे. या लिलावातून जी रक्कम मिळेल ती रक्कम ब्लू ऑरिजिन फाउंडेशनला दिली जाईल. या फाउंडेशनच्या माध्यमातून गणित आणि विज्ञान शिक्षणाला हातभार लावला जातो. २००० साली त्यांनी बेजोस ब्ल्यू ओरिजिन या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी एलन मस्क यांनी स्पेस एक्स कंपनीची स्थापना केली होती. बेजोस यांनी २०२० या वर्षात प्रत्येक सेकंदाला १.८१ लाख रुपये कमावले आहेत.