हॉलिवूडमध्ये महिलांच्या लैंगिक छळाची एकेक प्रकरणे उघड होत असतानाच साठ टक्के अमेरिकी महिलांनी त्यांना आयुष्यात कधी ना कधी लैंगिक छळाला सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे, त्यांच्यापैकी दोन तृतीयांश महिलांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. लैंगिक छळाच्या प्रकारांबाबत देशव्यापी पाहणीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

अमेरिकेतील राजकारण, करमणूक व उद्योग या सर्वच क्षेत्रात लैंगिक छळाचे प्रकार अलीकडे सामोरे आले आहेत. या पाहणीत केवळ वीस टक्के पुरुषांनी लैंगिक छळाचा अनुभव आल्याचे म्हटले असून त्यातील साठ टक्के पुरुषांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे. क्विनीपिअ‍ॅक विद्यापीठाने केलेल्या पाहणीनुसार ज्या महिलांनी लैंगिक छळ झाल्याचे सांगितले त्यांच्यापैकी ६९ टक्के महिलांनी तो कामाच्या ठिकाणी झाल्याचे म्हटले आहे. ४३ टक्के महिलांनी सामाजिक ठिकाणी तर ४५ टक्के महिलांनी रस्त्यावर, १४ टक्के महिलांनी घरातच लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे.

लैंगिक छळणूक हा गंभीर प्रश्न असल्याचे ८९ टक्के प्रतिसादकांनी म्हटले असून ५५ टक्के लोकांनी समाजमाध्यमांवर लैंगिक छळाच्या तक्रारींची वाच्यता होत असल्याने आता त्याबाबतची समज व जागरूकता वाढली असल्याचे सांगितले. या पाहणीचा नमुना १४१५ प्रतिसादक इतका होता व त्यात ३.१ टक्के चुका गृहित धरल्या आहेत असे विद्यापीठाचे या पाहणीतील सहायक संचालक टिम मॅलॉय यांनी सांगितले.

अमेरिकी समाजात महिला व पुरूष लैंगिक छळाला मोठय़ा प्रमाणात सामोरे जातात असे दिसून आले आहे. दहापैकी आठ महिलांच्या मते त्यांना लक्ष्य करून अशा प्रकारचा छळ करण्यात आला.’  – टिम मॅलॉय, क्विनीपिअ‍ॅक विद्यापीठ पाहणी सहायक संचालक