एकदा तरी आयफोन वापरावा, असं अनेकांना वाटतं आणि एकदा आयफोन वापरलेली व्यक्ती मग त्यानंतर आयफोनशिवाय दुसरा कोणताही फोन वापरत नाही, असंदेखील म्हटलं जातं. मात्र आयफोनची किंमत पाहता आयफोन वापरणं प्रत्येकाला शक्य होतच असं नाही. त्यामुळेच मग आयफोनचा विचार बाजूला ठेवून अनेकजण अँड्रॉईड फोन वापरतात. मात्र आता आयफोन आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. कारण अॅपल आयफोन ५ एस (iPhone 5S) च्या किमतीमध्ये मोठी घट करणार आहे.

अॅपलकडून ‘आयफोन ५ एस’ची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत खाली आणली जाऊ शकते, असं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिलं आहे. अॅपल भारतात दिवाळीपर्यंत एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन स्टोर सुरु करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. अॅपलचा भारतीय बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी अॅपलकडून आयफोन ५ एसची विक्री ऑनलाईन केली जाण्याची शक्यता आहे. अॅपलनं आयफोनच्या रिटेलर्सना याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या काळात आयफोन ५ एसची विक्री फक्त ऑनलाईन करण्यात येणार असल्यानं दुकानांमधील त्यांचा पुरवठा हळूहळू कमी करण्यात येईल, अशी कल्पना आयफोनच्या रिटेलर्सना कंपनीकडून देण्यात आली आहे.

सध्या आयफोन ५ एसची किंमत १८ हजार रुपये आहे. आयफोन एस ५ अॅपलने १५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिल्यास या सेगमेंटमधील अँड्रॉईड स्मार्टफोन्सला मोठी टक्कर मिळणार आहे. भारतात आयफोनप्रेमींची संख्या मोठी असल्याने त्याचा मोठा फायदा कंपनीला होऊ शकतो. आयफोन ५ एस चार वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला असला आणि आता जुना झाला असला तरीही, आयफोन वापरता येणार असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो.

शाओमी, मोटोरोला, ओप्पो, विवो, लेनोवो यांच्यासारख्या चिनी कंपन्यांना अॅपलच्या नव्या व्यूहनितीमुळे धक्का बसू शकतो. कारण आयफोन ५ एस १५ हजारात मिळत असल्याने आयफोनचे चाहते इतर फोन्सकडे पाठ फिरवू शकतात. मात्र आयफोन ५ एस ४ वर्षे जुना असल्याने त्यामधील प्रोसेसर आणि स्पेसिफिकेशन्सदेखील जुने आहेत. त्या तुलनेत आयफोन एसई फोन नवीन असल्याने त्याचे स्पेसिफिकेशन्सदेखील नवे आहेत. वर्षभरापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या या फोनचा आकार लहान आहे. अॅपलकडून २० हजार रुपयांना आयफोन एसईची विक्री केली जाते आहे.