रस्त्यावरील खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी यांमुळे हैराण झालेले मुंबईकर ही समस्या आता काही नवीन राहिलेली नाही. अनेकदा टाहो फोडूनदेखील रस्त्यांच्या या दुरावस्थेकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे मुंबईकरांकडे ‘आलीया भोगासी असावे सादर’ हा एकमेव पर्याय असतो. मात्र, बेंगळुरूमधील एका पठ्ठ्याने अनेकदा विनंती करून पालिका ऐकत नाही म्हटल्यावर पाणी साचलेल्या त्या खड्ड्यात चक्क मगर आणून ठेवली. त्यामुळे रस्त्यावरील या डबक्याचे रूपांतर चक्क मगर असलेल्या तलावात झाले होते. उत्तर बेंगळुरूमधील परिसरातील रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. त्यात येथे पाईपलाईन फुटल्यामुळे या खड्ड्याचे रूपांतर मोठ्या डबक्यात झाले होते. त्यामुळे येथील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागात राहणाऱ्या बादल नजुंदास्वामी यांच्यासह अनेक नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र, पालिकेने वारंवार त्यांच्या विनंतीकडे ढुंकून पाहिले नाही. पालिकेच्या या सततच्या दुर्लक्षामुळे अखेर बादल नंजुदास्वामी यांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबण्याचे ठरवले. त्यासाठी नंजुदास्वामी यांनी एक फायबरची मगर तयार करून ती पाणी साचलेल्या डबक्यात ठेवली. तब्बल १५ ते २० किलो वजनाची ९ फूट लांब ही मगर सुरूवातीला अनेक जणांना खरी भासली . त्यामुळे या भागातील काही महिलांची भीतीने पाचावर धारणदेखील बसली. मात्र, काही काळानंतर ही मगर खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांच्या जीवात जीव आला. परंतु एवढे करूनही स्थानिक पालिका प्रशासन येथील रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्यास तयार नाही. मात्र, या प्रकारामुळे सोशल प्रसारमाध्यमांवर या प्रकाराची मोठ्याप्रमाणावर वाच्यता झाली आहे. नजुंदास्वामी यापूर्वीदेखील रस्त्यावरील एका उघड्या मॅनहोलच्या समस्येकडे अशा अनोख्या पद्धतीनेच लक्ष वेधले होते. त्यानंतर पालिकेने त्वरीत कारवाई करत हा मॅनहोल बंद केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2015 रोजी प्रकाशित
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात ९ फुटांची मगर…
रस्त्यावरील खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी यांमुळे हैराण झालेले मुंबईकर ही समस्या आता काही नवीन राहिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-06-2015 at 12:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artiste in bengaluru brings crocodile on road to grab attention of civic authorities