Asiatic lions गुजरातमध्ये सिंहांची संख्या मागच्या पाच वर्षांत चांगलीच वाढली आहे. आशियाई सिंहाची संख्या आता ८९१ झाली आहे. याआधी म्हणजेच पाच वर्षांपूर्वी ही संख्या ६७४ इतकी होती. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

मे महिन्यात सिंह गणना

मे महिन्यात सिंह गणना करण्यात आली आहे. ज्यानुसार ही संख्या ८९१ इतकी झाली आहे. याआधी जून २०२० मध्ये सिंह गणना करण्यात आली होती तेव्हा गुजरातमध्ये ६७४ सिंह होते. मागील पाच वर्षांत सिंहांची संख्या २१७ ने वाढली आहे. आशियाई सिंहांची गणना १० मे ते १३ मे अशा चार दिवसांच्या कालावधीत चालली. ११ जिल्हे आणि ३५ हजार स्क्वेअर किमीचा भाग त्यासाठी पालथा घालण्यात आला. १० ते ११ मे या दोन दिवसांच्या कालावधीत प्राथमिक सिंह गणना झाली. ज्यामध्ये साधारण ३ हजार स्वयंसेवकांचं सहाय्य घेण्यात आलं.

गुजरातमध्ये सिंह गणना करण्यात आली आहे. (फोटो-संग्रहीत)

११ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली सिंह गणना

जुनागड, गीर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोराबी, सुरेंद्र नगर, देवभूमी द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर आणि बोटाड अशा जिल्ह्यांमध्ये सिंहांची संख्या वाढली आहे. आशियाई सिंह हे गुजरातच्या गीरमध्ये सर्वाधिक प्रमाणात आहेत. सिंह गणनेनुसार १९६ नर सिंह, ३३० मादी सिंह १४० मध्यमवयीन सिंह आणि २२५ छावे असल्याचंही ही सिंह गणना सांगते आहे. गीरमध्ये जे सिंह आहेत त्यांची संख्या ३८४ इतकी आहे. तर इतर ठिकाणी ५०७ सिंह आढळून आले आहेत. ही १६ वी सिंह गणना होती. दर पाच वर्षांनी गुजरातमध्ये सिंह गणना केली जाते. यावेळी सिंहांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या गणनेसाठी हाय टेक कॅमेरे वापरण्यात आले. तसंच रेडिओ कॉलर्सचाही वापर करण्यात आला. त्यावरुन सिंहांची ओळख पटवण्यात आली.