देशातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही चांगली संस्कृती नव्हे, असे मत केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची सवय चुकीची असून ती थांबविली पाहिजे. ही चांगली संस्कृती नव्हे. गेल्या काही काळात भारतात अशाप्रकारे विनाकारण प्रश्न उपस्थित करण्याची सवय वाढीला लागली आहे. सत्य काय ते बाहेर येईल. मी काहीही नाकारत नाही. मात्र, काही केवळ क्लिप, पेपर्सच्या आधारावर अशाप्रकारच्या धोक्याच्या घंटा वाजवणे योग्य नव्हे, असे रिजिजू यांनी म्हटले.
सध्या भोपाळ चकमकीच्या मुद्द्यावरून देशभरात राजकारण रंगले आहे. विरोधकांकडून भोपाळ पोलिसांची कारवाई बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. भोपाळ तुरुंग फोडून बाहेर पडलेल्या ‘सिमी’च्या संशयित आठ दहशतवाद्यांना चकमकीत मारल्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह आणि भाजपमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक उडाली. या बनावट चकमकीमागे कटकारस्थान असल्याचा दावा दिग्विजयसिंहांनी करताच भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. या घटनेनंतर राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवराजसिंह यांनी उपस्थित जनसमुदायाला पोलिसांनी ‘बरोबर केले की चूक केले’, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रेक्षकांनी ‘बरोबर केले’ असे उत्तर दिले. दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. आपल्याला न्यायव्यवस्था गतिमान केली पाहिजे. तुम्ही किती काळ कच्चे कैदी म्हणून त्यांच्यावर खटले (ट्रायल) सुरू ठेवणार. काहीजणांना चिकन बिर्याणी खायला घातली जाते. त्यामुळे आपण फास्ट ट्रॅक न्यायालयांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे चौहान यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी लांगुलचालन या शब्दाचा उल्लेख करत विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच राष्ट्रहित हे सर्वोच्च असल्याचे चौहान यांनी म्हटले होते. शिवराजसिंह चौहानांच्या या विधानाचे दिल्लीत पडसाद उमटले होते.

भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे आठ संशयित दहशतवादी सोमवारी चकमकीत ठार झाले. भोपाळ शहराच्या बाहेर असलेल्या इंटखेडी भागात ही चकमक झाली. या दहशतवाद्यांनी रात्री कारागृहातून पलायन केले होते. भोपाळपासून १० किमी अंतरावर ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दहशतवादी पसार झाले होते. दहशतवाद्यांनी तुरुंगातून पळताना सुरक्षारक्षकाची गळा चिरून हत्या केली. त्यांनी पळून जाण्यासाठी चादरीच्या साहाय्याने बनवलेल्या दोरीचा उपयोग करत कारागृहाची भिंत ओलांडली होती. मुजीब शेख, माजिद, खालिद, खिलजी, जाकीर, सलीम, महबूब आणि अमजद अशी त्यांची नावे आहेत. पळालेल्या आठ दहशतवाद्यांमध्ये जाकीर मेहबूब शेख आणि अमजद यांचा समावेश होता. हे दोघे २०१३ मध्येही कारागृहातून पळाले होते.

चकमक बनावट असल्याचा आरोप : भोपाळ येथे कारागृहातून पळून गेलेल्या सिमी संघटनेच्या आठही संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केल्याच्या घटनेतील एक संशयित खालिद अहमद म. सलीम मुछाले (वय ३७) हा सोलापूरचा राहणारा होता.  त्याच्या कुटुंबीयांनी ही चकमक खोटी असल्याचा आरोप केला आहे. खालिद हा कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून पळून जाणे केवळ अशक्य होते. कारागृहातून पळून गेल्यानंतर त्याच्या अंगात दुसरे कपडे कसे आले, हत्यारे कशी आली, असा सवाल करीत, ही  चकमक बनावट असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.