सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेकडे फार लक्ष देण्याची गरज नाही मी मुळीच विचलित झालेलो नाही असं गवई यांनी म्हटलं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राकेश किशोर यांना वेळीच रोखलं. त्यानंतर त्यांना कोर्टाबाहेर काढण्यात आले. यावेळी या वकिलाने ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ असा आरडाओरडा केला. या घटनेनंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने या राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एक सत्तरीतील वकील सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतरही गवई यांनी संयम राखला आणि न्यायालयात उपस्थित वकिलांना त्यांचा युक्तिवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश यावेळी म्हणाले, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.” असं सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्यामागे गवई यांनी दिलेला एक निर्णय असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकिलाने काय सांगितलं?

राकेश कुमार यांनी जेव्हा सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याबाबत एका वकिलाने सांगितलं की सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही सेकंदांसाठी बूट फेकणारे वकील काही वेळ तिथेच उभे होते. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की सरन्यायाधीश गवई यांनी काही दिवसांपूर्वी खजुराहोतील एका मंदिरात विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापना करा अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

खजुराहो मंदिराचं प्रकरण काय?

मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून तिथे नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टाइन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येतं. याचिकाकर्ते राकेश दलाल यांची विनंती ऐकल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असा दावा करता की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा.” असं गवई म्हणाले होते.

यानंतर गवई यांच्यावर सोशल मीडियावरुन टीका झाली होती. दरम्यान याच कारणामुळे त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती दिल्ली पोलीस सूत्रांनी दिली आहे.