सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची घटना मागच्या आठवड्यात ६ ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी वकील राकेश किशोर यांच्याविरोधात अवमानाचा खटला चालणार आहे. महाधिवक्ता. आर. वेंकरमनी यांच्याकडे याबाबतची संमती मागितली होती. ती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता वकील राकेश किशोर यांच्यावर अवमानाचा खटला चालणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर या प्रकरणी सुनावणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जज सूर्यकांत यांच्या पीठासमोर ठेवण्यात आलं प्रकरण

१६ ऑक्टोबरला हे प्रकरण जज सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पीठासमोर ठेवण्यात आलं. या पीठात जस्टिस जोयमाल्या बागचीही आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएशनचे अध्यक्ष वरिष्ठ वकील विकास सिंह आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे या पीठासमोर हजर झाले. त्यांनी कारवाईची संमती मिळाल्याची माहिती या बेंचला दिली.

६ ऑक्टोबरला काय घडलं होतं?

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ६ ऑक्टोबरला घडला. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून, या घटनेनंतर देशभरातून याचा निषेध करण्यात आला.

राकेश किशोर सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे सदस्य

पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत. पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे सदस्यत्व कार्ड असल्याचे आढळले होते. आता राकेश किशोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की सरन्यायाधीश गवई यांनी याप्रकरणी स्वतः कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता.