Vice Chancellor Sunita Mishra Apologized For Praising Aurangzeb: मुघल सम्राट औरंगजेबचा “सर्वोत्तम प्रशासक” असा उल्लख केल्याने टीका झाल्यानंतर उदयपूरच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या कुलगुरू सुनीता मिश्रा यांनी अखेर माफी मागितली आहे. एक व्हिडिओ आणि लेखी माफीनामा जाहीर करून, मिश्रा म्हणाल्या की, त्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, राजस्थानातील मेवाड येथील लोकांची आणि विशेषतः राजपूत समुदायाची माफी मागते.
“मेवाडची ही भूमी केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही तर ती शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाचे प्रतीक आहे. या पवित्र भूमीतच महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चौहान यांच्यासारख्या अमर वीरांचा जन्म झाला. जे अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणासाठी अढळ राहिले. त्यांची गौरवशाली गाथा आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील”, असे मिश्रा यांनी त्यांच्या माफीनाम्यात लिहिले आहे.
आपल्या माफीनाम्यात मिश्रा पुढे म्हणाल्या की, “उदयपूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या भाषणात मी औरंगजेबाचे वर्णन एक सक्षम शासक म्हणून केले. यामुळे महाराणा प्रताप यांच्या अनुयायांच्या आणि राजपूत समुदायाच्या भावना दुखावल्या. ही माझी चूक आहे. माझा हेतू कधीही या भूमीचा किंवा त्याच्या वीरांचा अपमान करण्याचा नव्हता. मी माझ्या चुकीबद्दल मेवाड, राजस्थानमधील सर्व लोकांची आणि विशेषतः राजपूत समुदायाची मनापासून माफी मागते.”
काय आहे प्रकरण?
१२ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम: अ रोडमॅप टू विकसित भारत २०४७’ परिषदेत बोलताना मिश्रा म्हणाल्या होत्या की, “औरंगजेब एक प्रशासक म्हणून, सर्वोत्तम होता.” यावेळी त्यांनी महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चौहान यांची अकबराशी तुलना केली होती आणि म्हटले होते की, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण या सर्व शासकांबद्दल ऐकत आलो आहोत.
मिश्रा यांच्या या विधानांमुळे कॅम्पसमध्ये तीव्र निदर्शने झाली होती, विद्यार्थ्यांनी त्यांच्या चेंबरला अनेक तास बाहेरून कुलूप लावले होते, तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. याचबरोबर त्यांच्या छायाचित्राला काळे फासत राजीनाम्याची मागणी केली होती. एबीव्हीपी, एनएसयूआय या विद्यार्थी संघटना आणि इतर काही संघटनांनी मिश्रा यांच्या विरोधात राज्यपालांना पत्र लिहिले होते.
उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री प्रेमचंद बैरवा यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, ते म्हणाले की, “हे प्रकरण माझ्या कानावर आले आहे, आम्ही वस्तुस्थितीची चौकशी करू आणि विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे कारवाई करू.”