Ayatollah Ali Khamenei On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या सर्वच निर्णयांची जगभरात चर्चा होते. खरं तर डोनाल्ड ट्रम्प अनेक वेगवेगळे निर्णय घेत असले तरी त्यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याच देशात म्हणजे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विरोधही होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या अनुषंगानेच ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प यांच्या हुकूमशाही वृत्तीच्या धोरणाच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. “नो किंग” असं नाव देण्यात आलेल्या आंदोलनाची आता जगभरात चर्चा होत आहे. अमेरिकेत लहान शहरांपासून ते न्यू यॉर्कसारख्या शहरांपर्यंत अशा प्रकारचे निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये नागरिक पोस्टर हातात घेऊन ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, या निदर्शनांवरून आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. तसेच अमेरिकेत वाढत्या निदर्शनांना हाताळण्याच्या ट्रम्प यांच्या क्षमतेवर खामेनी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘जर तुम्ही एवढेच सक्षम असाल तर त्यांना शांत करा’, असं थेट आव्हान खामेनी यांनी ट्रम्प यांना दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अयातुल्ला खामेनी काय म्हणाले?

“अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सात दशलक्ष लोक या व्यक्तीविरुद्ध घोषणा देत आहेत. जर तुम्ही तेवढे सक्षम असाल तर त्यांना शांत करा, त्यांना त्यांच्या घरी परत पाठवा आणि इतर देशांच्या कारभारात ढवळाढवळ करू नका”, अशा शब्दांत अयातुल्लाह खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं आहे.

“ट्रम्प म्हणतात की ते एक करार करणारे नेते आहेत. मात्र, जर करार जबरदस्तीने केला जात असेल आणि त्याचा परिणाम पूर्वनिर्धारित असेल तर तो करार नसून धमकावणे आहे”, अशा शब्दांत अयातुल्लाह खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं आहे. “अमेरिकेचे अध्यक्ष अभिमानाने म्हणतात की त्यांनी इराणच्या अणुउद्योगावर बॉम्बहल्ला केला आणि तो नष्ट केला. खूप छान, स्वप्न पाहत राहा”, अशा शब्दांत खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.