अयोध्येतील वादग्रस्त जागेवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर शनिवारी निकाल दिला. केंद्र सरकारने वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा. तसेच मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय न्यायालयानं दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत करत, ‘कोर्टाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल’ असा टोला भाजपा लगावला आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अयोध्या निकालानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सामाजिक सौहार्दता कायम ठेवण्याचं आवाहन करत काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूनं आहोत. या निर्णयानं फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.”

प्रत्येक भारतीयांचे हे कर्तव्य आहे की , देशातील बंधुभाव , एकता आणि सौहार्दाची भावना कायम ठेवावी . सर्व धर्म समभाव हा आमच्या देशाचा स्थायी भाव आहे . देशाची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे, एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आमची सर्वांची जबाबदारी असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं.