backward classes percentage increased in higher education zws 70 | Loksatta

उच्च शिक्षणात मागासवर्गीय टक्का वाढला ; ‘एआयएसएचई’च्या अहवालातील निष्कर्ष

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील संख्या २०१९-२०मध्ये २१.६ लाख इतकी होती.

backward classes percentage increased in higher education
२०१४-१५पासून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात २०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

नवी दिल्ली : देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासावर्गीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१४-१५ ते २०२०-२१ दरम्यान वाढत असल्याचा निष्कर्ष उच्च शिक्षणाबाबत सर्वेक्षण करणाऱ्या ‘एआयएसएचई’ या संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या काळात ४७ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, २०२०-२१मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या ४ कोटी १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये १४.२ टक्के विद्यार्थी अनुसूचित जातीचे असून ५.८ टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या ३५.८ टक्के इतकी असून एकत्रितपणे मागास विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५.८ इतके आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २०१९-२०च्या तुलनेत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे ओढा २०१४-१५ पासून वाढत असून हे प्रमाण २७.९६ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील संख्या २०१९-२०मध्ये २१.६ लाख इतकी होती. ती २०२०-२१मध्ये २४.१ लाखांवर पोहोचली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१४-१५ पासून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात ४७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २०११पासून ‘एआयएसएचई’ अहवाल तयार करण्यात येतो. त्यामध्ये  विद्यार्थी नोंदणी, शिक्षण माहिती, पायाभूत दर्जा, आर्थिक स्थिती आदी निकषांवर माहिती गोळा करण्यात येते. २०२०-२१च्या अहवालात प्रथमच उच्च शिक्षण संस्थांनी या सर्वेक्षणासाठी संकेतस्थळावर माहिती जमा केली आहे.

अहवालातील अन्य ठळक मुद्दे

२०१४-१५पासून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात २०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२०-२१मध्ये चार कोटी १३ लाख विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या २८.८० लाखांनी वाढली. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १८-२३ वयोगटातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण नोंदवणाऱ्या ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ’मध्ये २७.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 04:23 IST
Next Story
शिवसेना निवडणूक चिन्हाचा वाद : निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतीक्षा, ठाकरे-शिंदे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर