उत्तराखंडमधील हेलंग येथे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बद्रीनाथला जाणारा महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. दरड कोसळल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. महामार्गवर दरड कोसळल्याने हजारो पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे.
हेलंग येथील समोर आलेल्या व्हिडीओनुसार, दरड कोसळून महामार्गावर पडत आहे. दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. व्हिडीओत लोक इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
महामार्गावर दरड कोसळल्याने हजारो पर्यटक अडकले आहेत. गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासू येथे पर्यटकांना थांबण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. कर्णप्रयागचे मुख्याधिकारी अमित कुमार यांनी सांगितलं की, “हेलंग येथील ब्रदीनाथला जाणारा महामार्गावरील दरड हटवल्यानंतर पर्यटकांना सोडण्यात येईल.”
दरम्यान, रोडवरील दरड हटवण्यात आली आहे. त्यामुळे ब्रदीनाथला जाणाऱ्या महार्गावरील वाहतूक सुरुळीत झाल्याची माहिती चामोली पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे.