ढाका : विद्यार्थी जनआंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाच्या आरोपाअंतर्गत खटला चालवण्यासाठी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतातून प्रत्यार्पण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या नवनियुक्त मुख्य अभियोक्ता यांनी रविवारी सांगितले. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या अभूतपूर्व सरकारविरोधी निदर्शनांनंतर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून थेट भारतात पलायन केले होते.

हेही वाचा >>> संसद घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल; लोकशाहीची नाचक्की करण्याचा हेतू असल्याचा आरोप

‘भारताबरोबरच्या प्रत्यार्पण करारानुसार माजी पंतप्रधान हसीना यांना परत आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. जुलै आणि ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांदरम्यान झालेल्या सामूहिक हत्येच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात खटला भरला जाईल,’ असे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी सांगितल्याचे वृत्त ‘डेली स्टार न्यूजपेपर’ने दिले आहे. ‘आम्ही आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाकडे सामूहिक हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या संदर्भात शेख हसीना यांच्यासह सर्व फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करू,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.