येथिल अत्यंत प्रदुषित असलेला बेलांदूर तलाव पुन्हा एकदा विषारी फेसाने व्यापला आहे. काल रात्री या भागात झालेल्या पावसानंतर या तलावातील पाणी सर्वत्र फेसाळलेले दिसत होते.
Karnataka: Bellandur Lake in Bengaluru continues to spill toxic foam after overnight rain pic.twitter.com/mZwuoFqk9P
— ANI (@ANI) August 15, 2017
देशातील मोठे ‘आयटी शहर’ म्हणून ओळख असणाऱ्या बंगळूरू शहरातील जलसाठे तितकेच मोठ्या प्रमाणावर प्रदुषित आहेत. शहरातील तब्बल २६२ तलाव आणि इतर पाणी साठे प्रदुषणाच्या विळख्यात अडकले आहेत. या पाणी साठ्यांवर अनेकदा विषारी फेस तयार होत आहे. या फेसाला अनेकदा आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पाणी साठ्यांच्या या समस्येविरोधात राष्ट्रीय हरित लवादाने न्यायालयात सुओमोटो देखील दाखल केली आहे. याप्रकरणी हरित लावादाने १९ एप्रिल रोजी शहरातील ७६ प्रदुषित कंपन्या पूर्णपणे बंद करण्यात याव्यात अशी मागणी देखील न्यायालयाकडे केली आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यांत बेलांदूर तलावाभोवतालच्या कचऱ्याला आग लागली होती.
या प्रकरणी हिरत लवादाने नाराजी व्यक्त करताना, इतर राज्यांच्या सरकारी एजन्सींना बेलांदूर तलावाच्या स्वच्छतेचे आवाहन केले होते. तसेच महिन्याभराच्या आत हा तलाव स्वच्छ करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले होते. त्याचबरोबर या तलावात सांडपाणी सो़डणाऱ्यांवर राज्याच्या प्रदुषण नियंत्रण विभागाकडून अद्याप कारवाई का केली गेली नाही असा सवालही हरित लवादाने उपस्थित केला होता.
दरम्यान, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक सरकारने एका समितीची स्थापना केली असून नगरविकास खात्याच्या अंतर्गत बेलांदूर तलावाच्या पुनरूज्जीवनाचे काम केले जाणार आहे.