विमानतळावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने विमानतळ व्यवस्थापनाला बॉम्ब असल्याचा फोन करणाऱ्या बंगळुरुतील जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरुतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री कोचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला होता. यामुळे कोचीला जाणारे एअर एशियाच्या विमानासाठी तब्बल ७ तास उशीर झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलिसांनी कोचीला जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांना दोन दिवसांमध्ये बंगळुरुला परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केम्पेगौडा विमानतळाच्या टर्मिनल व्यवस्थापकाला बुधवारी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी कोचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. कोचीला जाणारे विमान ८ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. यानंतर विमानतळ व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर बॉम्बसाठी करण्यात आलेला फोन कॉल अफवा असल्याचे समोर आले. मात्र बॉम्ब शोधक पथकाच्या तपासणीला सहा तास लागल्याने बुधवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करण्याच्या तयारीत असणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला रात्रीचे ३ वाजले. त्यामुळे विमानातील १६० प्रवाशांचा खोळंबा झाला.

बुधवारी बंगळुरुतील नेहा गोपीनाथन आणि अर्जुन हे दोघे केरळमधील त्यांच्या मूळ घरी जात होते. मात्र विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्याने या जोडप्याने विमानतळ प्रशासनाला विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करण्याचा निर्णय घेतला. ‘ते दोघे वाहतूक कोंडीमुळे बुधवारी रात्री ८ वाजता जयानगर परिसरात अडकले होते. विमानतळावर वेळेत पोहोचता येणार नाही, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्या दोघांनी त्यांच्या कोचीतील एका मित्राला फोन करुन बंगळुरुतील केम्पेगौडा विमानतळ प्रशासानाला कोचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन करण्यास सांगितले,’ अशी माहिती बंगळुरुतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बंगळुरुतील विमानतळाला फोन करणाऱ्या कोचीतील मित्र अद्याप फरार असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे.

सध्या बंगळुरु पोलिसांनी संबंधित जोडप्याला कोचीला जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र या जोडप्याला दोन दिवसांनंतर बंगळुरुत परतण्याची आणि पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे नेहा आणि अर्जुन यांनी बुधवारी रात्री ८ च्या सुमारास विमानतळावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने विमान उड्डाणास उशीर करण्याची विनंती करणारा कॉल केला होता.