Bengaluru man Wins case against PVR-INOX : बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने चित्रपटाच्या आधी २५ मिनिटे जाहिरात दाखवून वेळ वाया घालल्याबद्दल पीव्हीआर-आयनॉक्स या चित्रपटगृहाविरोधात खटला दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने हा खटला जिंकला देखील. यानंतर न्यायालयाने चित्रपटगृह चालवणाऱ्या कंपनीला तिकिटांवर जाहिरात संपून चित्रपट नेमका कधी सुरू होणार ती वेळ देखील देण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारकर्ते अभिषेक एमआर हे २६ डिसेंबर २०२३ रोजी सॅम बहादूर हा चित्रपट पहायला पीव्हीआर सिनेमागृहात गेले होते. यावेळी चित्रपट सुरू होण्याची वेळ दुपारी ४ वाजून ५ मिनिटं देण्यात आली होती. पण चित्रपट ४ वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच २५ मिनिटे जाहिराती दाखवल्यानंतर सुरू झाला. यामुळे त्यांचे पुढील नियोजन ढासळले आणि चित्रपट बघून पटकन कामावर परत येण्याचं त्यांचं नियोजन विस्कळित झालं. या प्रकारामुळे वैतागलेल्या अभिषेक यांनी पीव्हीआर, आयनॉक्स याणि बुकमायशो (BookMyShow) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, बार अँड बेंचने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात बुकमायशो जबाबदार नसल्याचे म्हटले आहे, कारण त्यांच्याकडून चित्रपटाच्या वेळापत्रकांवर नियंत्रण ठेवले जात नव्हते.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायालयाने आपल्या निर्णयात चित्रपटगृहांवर तसेच त्यांच्या अनुचित व्यापार पद्धतीवर टीका केली आहे. “नव्या युगात वेळेला पैशांचे महत्त्व आहे, प्रत्येकाचा वेळ हा बहुमूल्य आहे… चित्रपटगृहात बसून अनावश्यक जाहिराती पाहण्यासाठी २५-३० मिनिटे हा बराच मोठा काळ आहे. व्यस्त वेळापत्रक असलेल्या लोकांकडे वाया घालवण्यासाठी वेळ नसतो.” कोर्टाने ही व्यापार करण्याची चुकीची पद्धत असल्याचे मान्य करत पीव्हीआर आणि आयनॉक्सला नियोजित चित्रपट सुरू होण्याच्या वेळेनंतर जाहिराती चालवणे थांबवण्याचे आदेश दिले.

पीव्हीआर आणि आयनॉक्स यांनी त्यांच्या बचाव करताना असा युक्तिवाद केला की, चित्रपटापूर्वी दाखवण्यात येणार्‍या जाहिरातींमुळे चित्रपटाला उशिरा पोहचणाऱ्यांनाही चित्रपट पाहाता येतो आणि त्या चित्रपटगृहांमध्ये पब्लिक सर्व्हिस अनाउन्समेंट (पीएसए) करण्यासाठी आवश्यक आहेत. न्यायालयाने ही गरज मान्य केली असली तरी, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पीएसएची मर्यादा १० मिनिटांपर्यंत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबरोबरच सॅम बहादूरच्या प्रदर्शनापूर्वी दाखवल्या गेलेल्या ९५ टक्के जाहिराती या सरकारी पीएसएऐवजी व्यावसायिक स्वरुपाच्या होत्या, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.

मानसिक त्रास दिल्याबद्दल २० हजारांची नुकसानभरपाई

दंड म्हणून कोर्टाने पीव्हीआर आणि आयनॉक्स यांना अभिषेक यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल २० हजार रुपये आणि कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून ८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांना अनुचित व्यापार पद्धत वापरल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru man wins case against pvr inox for wasting time playing 25 minutes of advertisement marathi news rak