बिहारमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कायदाक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील तरुणीची गावातील काही तरुणांकडून वारंवार छेड काढली जात होती. सदस्यांनी याला विरोध केला असता त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. वैशाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
“नंदकिशोर भगत यांच्या कुटुंबातील सदस्यांची गावातील काही लोकांशी मंगळवारी भांडणं झाली. दोन्ही गटातील लोक एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती चिघळली होती. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी राघव दयाल यांनी दिली आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी काही लोक जबरदस्तीने नंदकिशोर यांच्या घरात घसुले आणि अॅसिडने कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. “संपूर्ण कुटुंबावर अॅसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. जवळपास २० जणांनी धडा शिकवण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकऱणी पाच जणांना अटक केली आहे.