भारतीय देवदेवतांचा टॅटू पायावर गोंदविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाला स्थानिक पोलिसांनी अटक करून धमकी दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या पायावर देवतांचा टॅटू गोंदविल्याने गुन्हा घडला आहे, याप्रकरणी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी परदेशात जाऊन स्थानिक कायदा आणि परंपरा यांचा सन्मान करून त्याबाबत संशोधन करावे यासाठी ऑस्ट्रेलियाचे सरकार प्रोत्साहन देते, असे उच्चायुक्तालयातील प्रवक्त्याने सांगितले.
मात्र पायावर टॅटू गोंदविल्याने पोलिसांनी ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाला ताब्यात घेऊन धमकी देणे याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चेन्नईतील ऑस्ट्रेलियाच्या वकिलातीमधील अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असून, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दाम्पत्याशी संपर्क साधला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
येल्लम्मा या देवतेचा टॅटू पायावर गोंदविल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने आपला छळ केला, असा आरोप मॅट कीथ आणि त्याची मैत्रीण इमिली यांनी केल्यानंतर उच्चायुक्तांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. जाणूनबुजून तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे माफीपत्र लिहून देण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोपही या दाम्पत्याने केला आहे.
या दाम्पत्याने केलेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. हा प्रसंग या दाम्पत्याने फेसबुकवर टाकला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. तथापि हा प्रकार जेथे घडला तो परिसर झोपडपट्टीने वेढलेला आहे. या दाम्पत्याच्या पायावर टॅटू गोंदविण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पोलिसांना पाचारण केले, असे रमेश यादव या भाजपच्या स्थानिक नेत्याने सांगितले.
सदर प्रकार कळल्यानंतर पोलीस अहआयुक्त या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. संबंधित दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. आपला छळ करण्यात आल्याचा दावा या दाम्पत्याने केला असून, त्यामध्ये तथ्य आढळल्यास बंगळुरू पोलीस हे प्रकरण गंभीरतेने हाताळतील, असे पोलीस उपायुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.