पश्चिम बंगालमधील राजकारणाला गुरूवारी हिंसक वळण मिळालं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर आणि कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्याला भाजपची नौटंकी असल्याचं म्हटलं. तर नड्डा यांनी ममता यांना प्रशासनाची माहितीच नाही आणि प्रशासनाची धुरा चुकीच्या हातांमध्ये गेली आहे असा आरोप केला.

“ममता बॅनर्जी यांना प्रशासनाबाबत कोणतीही माहिती नाही. हल्लेखोरांना रोखणं हे पोलिसांचं काम आहे. पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे,” असं नड्डा म्हणाले. तसंच झालेला हल्ला हा भाजपाची नौटकी आहे या ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर त्यांनी संतापही व्यक्त केला.

आणखी वाचा- “आता उत्तर द्यावंच लागेल”; अमित शाह यांचा ममता सरकारला इशारा

“ममत बॅनर्जी प्रशासनाकडून आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही. त्यांच्या सरकारमध्ये प्रशासन नावाची गोष्टच शिल्लक नाहीये. पश्चिम बंगालची धुरा चुकीच्या हातांमध्ये गेली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात अराजकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील जनतेनं आता ममता बॅनर्जी यांना नमस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. डायमंड हार्बर परिसरात ज्याप्रकारे लोकं एकत्र आली, आमचं समर्थन केलं यावरून आता लोकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येत आहे,” असंही नड्डा यावेळी म्हणाले. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. आम्ही माजी पंतप्रधान इदिरा गांधी यांच्याविरोधातही लढलो आहोत. या तर ममता बॅनर्जी आहेत. सत्तेत असताना जे लोकांना विसरतात त्यांच्याकडून जनता सत्ता काढून घेते. पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादविवादासाठी कोणतीही जागा नाही. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी पश्चिम बंगलला दिशा देण्याचं काम केलं परंतु भारतात आज हे लोकशाहीसाठी हानीकारक ठरत आहे. असहिष्णुतेचं नाव ममता बॅनर्जी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.