भाजपच्या धमक्यांनी मी गप्प बसणार नाही. महाराष्ट्र आणि बिहारसारखे राज्य गप्प बसू शकतात. पण पश्चिम बंगालचा लढा आणि विरोध सुरूच राहील, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी भाजपला ठणकावले आहे. असहिष्णुता आणि फूट पाडण्याच्या राजकारणापासून देशाला वाचवण्यासाठी केवळ पश्चिम बंगाल लढा देऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
Threat and intimidation cannot silence me: WB Chief Minister @MamataOfficial. pic.twitter.com/DW2kpPvhA7
— Press Trust of India (@PTI_News) May 11, 2017
भाजपमध्ये हिंमत असेल तर मला तुरुंगात टाकून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपविरोधात लढाई सुरूच राहील आणि प्रसंगी तुरुंगात जाण्याचीही तयारी आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. मांस आणि गोहत्येवरून सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले. मी राजकारणात आहे. पण इतरांनी काय खायचे आहे, हा अधिकार मला दिलेला नाही. धर्म आपल्याला यावर राजकारण करण्याची आणि लोकांना शिक्षा करण्याची शिकवण देत नाही. विश्वास, शांती, प्रेम आणि बंधूभाव हा धर्माचा खरा अर्थ आहे, असेही त्यांनी सांगितले.
३० एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मंडल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत असभ्य भाषा वापरली होती. याबाबतही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्याने अशी असभ्य भाषा वापरणे ही शरमेची बाब आहे. मला न्याय हवा आहे. मी वाईट असू शकते. पण मलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मला न्याय हवा आहे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.