ब्लू व्हेल या मोबाईल गेममुळे ट्रेनखाली उडी मारून ११ वीतल्या विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपविल्याचा संशय व्यक्त होतो आहे. सत्विक पांडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मध्यप्रदेशातील दमोह या ठिकाणी रहात होता. सत्विकने ब्लू व्हेल गेम डाऊनलोड केला होता आणि तो या गेमच्या लेव्हल पूर्ण करत होता. सत्विक आम्हा सगळ्यांनाही हा गेम खेळा असा आग्रह करत होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा सत्विकने आत्महत्या केल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्विकच्या कुटुंबाने मात्र या सगळ्या घटनेबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सत्विकच्या आत्महत्येबाबत पोलीस तपासही सुरू आहे, पोलिसांकडूनही याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. ब्लू व्हेल गेमचा अँगलही पोलीस तपासून पाहात आहेत अशीही माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी एमबीए करणाऱ्या एका विद्यार्थ्याने ब्लू व्हेल या खेळामुळे आपले आयुष्य संपविले होते. आता आणखी एक घटना समोर आली आहे. ब्लू व्हेल या खेळामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. रशियातून या खेळाचे लोण जगभरात पसरताना दिसते आहे रशियात या गेममुळे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

१२ ते १६ या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचे प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे. मुंबईत मनप्रीत नावाच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर देशभरात या गेममुळे आत्महत्या केल्याच्या पाच ते सहा घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.

नेमका आहे तरी काय आहे हा ब्लू व्हेल गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो
अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.
रक्तानं ब्लू व्हेल कोरणे, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात
गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो
हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blue whale game claims one more life in mp