पीटीआय, आग्रा : आंतराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लेखिका गीतांजली श्री यांच्या सन्मानार्थ होणार असलेला कार्यक्रम आयोजकांनी शनिवारी स्थगित केला. कादंबरीमध्ये देवतांविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप करून गीतांजली यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सांस्कृतिक संघटना ‘रंगलीला’ आणि आग्रा थिएटर क्लबने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘‘ बुकर पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांच्या विरोधातील तक्रारीनंतर वाद निर्माण झाल्याने कार्यक्रम स्थगित करण्यात आला,’’ अशी माहिती ‘रंगलीला’च्या अनिल शुल्का यांनी दिली.
‘‘शादाबादमधील हाथरस येथील संदीप कुमार पाठक यांनी लेखिकेविरोधात तक्रार दाखल केली असून गीतांजली श्री यांनी शंकर आणि पार्वती या देवतांविषयी आक्षेपार्ह मत व्यक्त केल्याचा आरोप केला आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
वादामुळे लेखिकेला धक्का
- गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कांदबरीच्या ‘सँड ऑफ टुम्ब’ या इंग्रजी अनुवादाला मे महिन्यात बुकर पुरस्कार मिळाला होता.
- अभिनंद समितीचे प्रवक्ता रामभरत उपाध्याय यांनी सांगितले की, या प्रकारामुळे गीतांजली श्री यांना मोठा धक्का बसला आहे.
- लेखिकेच्या म्हणण्यानुसार त्यांना विनाकारण राजकीय वादात ओढण्यात येत आहे.