लग्न ही अशी गोष्ट असते ज्यामुळे ते करणाऱ्या दोघांच्याही आयुष्याला नवं वळण लागतं. दोन आयुष्यांची ही नवी सुरुवात असते. पण लग्नाला अवघा एक तास उरलेला असताना साडीवरुन आणि पैशांवरुन झालेला वाद शिगेला गेला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला ठार केलं आहे. लग्नाला अवघा एक तास उरलेला असताना ही घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या भावनगर येथील आहे. टेकडी चौकाजवळ असलेल्या प्रभूदास तलावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. साडी आणि पैसे यावरुन वाद झाला आणि तो इतका शिगेला गेला की होणाऱ्या पतीने त्याच्याच होणाऱ्या पत्नीला संपवलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजन बराईया आणि सोनी हिमंत राठोड या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. हे दोघंही मागच्या एक ते दीड वर्षांपासून एकत्र राहात होते. त्यांनी साखरपुड्याचे विधी पूर्ण केले होते. त्यानंतर लग्नाला अवघा एक तास राहिलेला असताना सोनी आणि साजन यांच्यात साडीवरुन आणि पैशांवरुन वाद झाला. साजनने लोखंडी पाईपने सोनीवर वार केले. त्यानंतर भिंतीवर तिचं डोकं आपटलं आणि तिच्यावर वार करुन तिला ठार केलं. एवढंच नाही तर या दोघांचा ज्या ठिकाणी वाद झाला त्या घराची नासधूस साजनने केली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांच्या लग्नाला होता विरोध

दोघांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबाने विरोध दर्शवला होता. तरीही हे दोघं मागील दीड वर्षापासून एकत्र राहात होते. शननिवारी या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र दोघांमध्ये प्रचंड वाद झाला आणि ज्यानंतर राग अनावर झालेल्या साजनने सोनीला लोखंडी पाईपने मारहाण केली. पोलीस उप अधीक्षक आर. आर सिंघल यांनी ही माहिती दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान सिंघल म्हणाले की साजनने सोनीला लोखंडी पाईपने मारलं आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं त्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. आम्ही तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे आणि पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं.