Boing 787-8 British Airways Flight Emergency Landing: गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत २७४ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात विमानातील २४१ प्रवाशांसह जिथे विमान कोसळलं तिथल्या ३३ नागरिकांचा समावेश होता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच ते कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर विमान प्रवासाची सुरक्षितता, बोईंग विमानांचा दर्जा या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच आणखी एका बोईंग विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्याचं समोर आलं आहे. हिथ्रो विमानतळावरून चेन्नईच्या दिशेनं उड्डाण घेतलेल्या या विमानाचं पुन्हा हिथ्रो विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी हिथ्रो विमानतळावरून ब्रिटिश एअरवेजचं BA35 हे बोईंग ७८७-८ या विमानाने उड्डाण घेतलं. उड्डाणाला जवळपास ३६ मिनिटे उशीर झाला होता. ‘फ्लाईट रडार २४’ वरील माहितीनुसार, या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळ ते हवेत स्थिरावलं. पण काही अंतर जाताच डोव्हरच्या खाडीला वळसा घालून पुन्हा लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेनं आलं आणि इमर्जन्सी लँडिंग केलं.
यासंदर्भात ब्रिटिश एअरवेजकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. “या विमानाचं हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग झालं. सर्व क्रू सदस्य आणि प्रवासी सुखरूपपणे खाली उतरले आहेत. नियमित प्रक्रियेनुसारच सारंकाही घडलं. या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून लवकरात लवकर सर्व प्रवाशांना मार्गस्थ करण्यासाठी आमचं टीम कसोशीने प्रयत्न करत आहे”, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या विमानाचंही लँडिंग
दरम्यान, आणखी एका घटनेमध्ये लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या विमानाचंही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे लँडिंग झाल्याचं वृत्त पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. फ्रँकफर्टहून हैदराबादसाठी या विमानानं टेकऑफ केलं होतं. यासंदर्बात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला यासंदर्भात माहिती देणारा मेसेज प्राप्त झाला असून त्यात विमान फ्रँकफर्टला परतलं असल्याचं नमूद केलं आहे. हे विमान बोईंग ७८७-९ श्रेणीतील असल्याचं सांगितलं जात आहे.