उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका खासगी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नावामधील गोंधळामुळे रुग्णालयामध्ये ताप आलेल्या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यात आली. या गरज नसताना केलेल्या शस्त्रक्रीयेमुळे रुग्णाची तब्बेत बिघडली. त्याची प्रकृती खालावी आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने या प्रकरणानंतर रुग्णालयाला सीर केलं आहे. या रुग्णालयाजवळ मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी फार गोंधळ केल्याने जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी या नर्सिंग होमविरोधात गुन्हा दाखल केलाय.

समोर आलेल्या माहितीनुसार नरसेना पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील किरयारी गावातील रहिवाशी असणारे ४४ वर्षीय यूसुफ हे ताप आल्याची तक्रार घेऊन बुलंदशहर जिल्हा मुख्यालयातील सुधीर नर्सिंग होममध्ये आले होते. तेथे त्यांना दाखल करुन घेण्यात आलं. मात्र नावातील गोंधळामुळे यूसुफ यांच्या गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलीय. याच ऑपरेशनमुळे यूसुफ यांचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या नेतेवाईकांचा आरोप आहे. संतापलेल्या नातेवाईकांचा रोष ओढवून घेण्यापासून पळ काढण्याच्या दृष्टीने डॉक्टर फरार झाला. त्यामुळे युसूफ यांना योग्य उपचार वेळेत मिळाले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

पोलिसांनी युसूफ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाला पाठवला आहे. शवविच्छेदन करताना व्हिडीओग्राफी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. शवविच्छेदनादरम्यान सर्व सत्य समोर येईल असा नातेवाईकांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची एक समिती नेमून शवविच्छेदनादरम्यान व्हिडीओग्राफी केली जाईल अशा शब्द नातेवाईकांना दिलाय. या प्रकरणाचा सध्या पोलीसही तपास करत आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी विनय कुमार यांनी खासगी रुग्णालयामधील या डॉक्टरविरोधातील गंभीर आरोपांबद्दल माहिती मिळाल्याचं सांगितलं. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. रुग्णालय सध्या सील करण्यात आलं आहे. दोषी आढळून आल्यास डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. पोलीस सध्या फरार डॉक्टरचा शोध घेत आहेत.