पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भरधाव बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे २७ प्रवासी ठार तर ६९ जण जखमी झाले. या बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी होते. या बसमध्ये क्षमते जास्त प्रवासी होते, असे पोलिसांनी सांगितले. ही बस कोहाटवरून रायविंडला जात होती. ही घटना बुधवारी रात्री कल्लर कहार नगर येथे घडली.
बसमधील प्रवासी हे रायविंड येथे होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते, अशी माहिती सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी मुहम्मद अफजल यांनी दिली. ‘दुनिया न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार अपघातातील मृतांची संख्या २७ इतकी झाली आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, १३ जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रावळपिंडी येथे हलवण्यात आले असून इतर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
धुक्यामुळे रात्री दहा नंतर मार्ग बंद केला जातो. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे बस चालकाने नेहमीचा मार्ग सोडून ग्रँड रोडने गाडी दामटल्याचे अफजल यांनी सांगितले.