खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची देशांतर्गत लोकप्रियता घसरल्याचं समोर आलं आहे. इप्सोस (Ipsos) नं ग्लोबल न्यूजसाठी केलेल्या सर्वेमधून हा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे ट्रुडो यांच्यासमोर एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. कॅनडामध्ये काही महिन्यांत निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी आपली प्रतिमा व लोकप्रियता सांभाळून ठेवण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर असेल. आज निवडणुका झाल्या तर जस्टिन ट्रुडो यांचा कॅनडामध्ये पराभवही होऊ शकतो, असा तर्क या सर्व्हेतील निष्कर्षावरून लावला जात आहे.
नेमकं काय घडलं?
जून महिन्यात कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तीन दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला. भारताच्या कॅनडामधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचीही त्यांनी हकालपट्टी केली. यावर भारत सरकारनंही सडेतोड उत्तर देताना कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॅनडाच्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भारतानं परत पाठवलं.
मोदींना जी २० परिषदेतच बायडेन यांनी कॅनडाच्या आरोपांबाबत सांगितलं होतं? नव्या दाव्याची चर्चा!
हे प्रकरण आता अधिक चिघळलं असून दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांना दुसऱ्या देशात जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतानं तर कॅनडामधील आपली व्हिसा सेवाही तात्पुरती स्थगित केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी कॅनडाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे जागतिक पातळीवरही पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
जस्टिन ट्रुडोंचा निवडणुकांसाठी प्रयत्न?
कॅनडामध्ये काही महिन्यांत निवडणुका होणार असून कॅनडामधील आपली प्रतिमा उजळवण्यासाठी राष्ट्रभक्ती व देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा पुढे करून जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अमेरिका व ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी कॅनडाला पाठिंबा दिल्यामुळे यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले आहेत. पण असं असलं, तरी भारतावर आरोप करणं ट्रुडो यांना फारसं फायद्याचं ठरलं नसल्याचंच दिसून येत आहे.
ट्रुडो नव्हे, पायरे पॉलिवरे पहिली पसंती!
जस्टिन ट्रुडो व विरोधी पक्षाचे उमेदवार पायरे पॉलिवरे हे कॅनडाच्या पंतप्रधानपदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, आत्तापर्यंत आघाडीवर असणारे जस्टिन ट्रुडो पसंतीक्रमामध्ये आता खालच्या स्थानावर आले आहेत. एकीकडे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कॅनेडियन नागरिकांपैकी ४१ टक्के लोकांनी पायरे यांना पसंती दिली असून ट्रुडो यांच्यासाठी ३१ टक्के लोकांनी मतं दिली आहेत. विशेष म्हणजे, खलिस्तान समर्थक जगमीत सिंगयांच्या न्यू डेमॉक्रेटिक पार्टीचीही लोकप्रियता घसरल्याचं या सर्वेमधून दिसून आलं आहे. हिंदुस्थान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. जगमीत सिंग यांच्या पक्षाचा ट्रुडो यांच्या सरकारला पाठिंबा आहे.
Video: “कॅनडाच्या संसदेत भारतावर आरोप करण्याचा निर्णय…”, जस्टिन ट्रुडोंनी दिलं स्पष्टीकरण!
भारतावरील आरोपांबाबत पायरे यांचा हल्लाबोल
दरम्यान, पायरे पॉलिवरे यांनी भारतावरील आरोपांवरून जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. “जस्टिन ट्रुडो यांनी या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती देशाला दिली पाहिजे. ट्रुडो यांच्या हाती अशा कोणत्या गोष्टी लागल्या, ज्याच्या आधारावर त्यांनी एवढा मोठा आरोप भारतावर केला हे त्यांनी सांगायला हवं. त्यानंतरच कॅनेडियन नागरिक त्यावर आपला कौल देतील”, असं पायरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada prime minister justin trudeau popularity goes down on hardeep singh nijjar murder case pmw