भारतीय व्यापारी नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांना सागरी शौर्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सरकारने रविवारी मेनन यांना आयएमओकडून पुरस्कार मिळणार असल्याची माहिती दिली. मागील वर्षी जूनमध्ये राधिका मेनन यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुर्गाम्मा या बुडत्या जहाजासह सात मच्छीमारांना वाचविले होते. या जहाजातील मच्छीमारांचे अन्न समुद्राच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यानंतर हे मच्छीमार बर्फावर जिवंत राहिले होते. १५ ते ५० वयोगटातील या मच्छीमारांना वाचविण्यासाठी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढल्याच्या पराक्रमाबद्दल राधिका मेनन यांना २०१६ मधील विशेष शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुद्र संघटनेच्यावतीने (आयएमओ) हा  पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार पटकाविणाऱ्या राधिका मेनन या जगातील पहिल्या महिला आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना (आयएमओ) ही संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमानाने जहाज सुरक्षा आणि जहाजांद्वावारे समुद्रात होणाऱ्या प्रदुषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असते. त्यामुळे अशा संस्थेकडून भारतीय महिलेला मिळणारा हा सन्मान कौतुकास पात्र आहे. महिला जगात आपला ठसा उमटविण्यात सक्षम असल्याचे राधिका मेनन यांच्या शौर्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain radhika menon bravery imo award