आज गुड फ्रायडे आणि रविवारी सुट्टी असल्याने आठवड्याच्या शेवटी एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण होणार आहे. पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यांना चलन टंचाईचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आज (शुक्रवार) गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुट्टी आहे. तर रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी सुटेल. बँकांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेकडून मागणीच्या तुलनेत केवळ २५% चलनाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये रोख रकमेची टंचाई जाणवणार आहे. राज्यातील महानगरांमधील एटीएममध्ये आधीच रोख रकमेची टंचाई आहे. त्यात आता शुक्रवार आणि रविवारच्या सुटीने आणखी भर पडणार आहे.

देशभरातील एटीएमची संख्या २ लाखांपेक्षाही अधिक आहे. मात्र या एटीएमच्या तुलनेत रोख रकमेची उपलब्धता अतिशय कमी आहे. त्यामुळे एटीएममध्ये रोख रकमेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. याचा मोठा फटका राज्यातील मुख्य शहरांसह ग्रामीण भागालादेखील बसणार आहे. ‘नवी दिल्ली, उत्तर प्रदेशासह उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये नोटांचा पुरवठा होतो आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येदेखील चलन पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे,’ अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

‘नोटाबंदीनंतर चलन टंचाई आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा रोख रकमेच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोकड पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोकड टंचाईच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत,’ असे कॅश लॉजिस्टिक्स असोसिएशनचे सचिव एन. एस. जी. राव यांनी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. कॅश लॉजिस्टिक्स असोसिएशनशी निगडीत कंपन्यांकडून एटीएममध्ये रोख रकमेचा पुरवठा केला जातो आहे.

आजपासून पुढील तीन दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजेच शनिवारी बँका सुरु असतील. त्यामुळे रोख रकमेच्या पुरवठ्याचे संकट गहिरे होण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये चलन पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘राज्यातील निवडणुकांमुळे रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा सर्वाधिक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये रोख रकमेचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल,’ असे खासगी बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.