पीएनबीच्या ब्रॅडी रोड शाखेत सीबीआयची शोधमोहीम
हिरे उद्योग सम्राट नीरव मोदी याच्या फायर स्टार इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी विपुल अंबानी यांची सीबीआय चौकशी करत असून, पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी रोड शाखेत शोधमोहीमही राबवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अंबानी हे तीन वर्षांहून अधिक काळ या पदावर असून, पंजाब नॅशनल बँकेने ११४०० कोटी रुपयांच्या या व्यवहाराची माहिती पोलिसांना कळवण्यापूर्वी देशातून पळून गेलेल्या नीरव मोदी याच्या कंपनीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांना होती असे मानले जात आहे. विपुल अंबानी हे दिवंगत उद्योगसम्राट धिरुभाई अंबानी यांचे नातेवाईक असल्याचेही समजते.
दरम्यान, नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित या प्रचंड आर्थिक घोटाळ्याचे केंद्र असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी रोड शाखेत सीबीआयने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली. सोमवारी शिवजयंतीनिमित्त बँकेचे नियमित कामकाज बंद असले, तरी कुठलाही संभाव्य फेरफार टाळण्यासाठी सोमवारी पहाटे या शाखेला सील लावले. नंतर ते उघडण्यात आले, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने दिली.
या घोटाळ्याच्या संबंधात अटक करण्यात आलेले पीएनबीचे दोन अधिकारी आणि नीरव मोदीच्या कंपनीचा एक प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता (अॅथॉराइज्ड सिग्नेटरी) यांची चौकशी सीबीआयने सुरूच ठेवली आहे. याशिवाय महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह आणखी पाच अधिकाऱ्यांची चौकशीही सीबीआयने सुरू केल्यामुळे, सध्या एकूण ११ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यातील पैशाचा स्रोत काय आणि हजारो दस्ताऐवज व डिजिटल रेकॉर्ड यांचा संबंध असलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती शोधण्यासाठी पीएनबीचे निवृत्त अधिकारी गोकुलनाथ शेट्टी, बँकेचा कर्मचारी मनोज खरात आणि पीएनबीच्या इतर अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.