देवदत्त नागे
लहानपणी मी आणि माझा मित्र अनुप सतत क्रिकेट खेळायचो. तेव्हा निळ्या रंगाच्या आणि त्यावर आपल्या संघाचे चिन्ह असलेल्या टोप्या डोक्यावर घालून मिरवण्यात वेगळीच मजा असायची. ती टोपी डोक्यावर चढताच अंगात वेगळंच स्फुरण चढायचं. आजही क्रिकेटसाठी लागणारी सीझनची बॅट, चेंडू, ग्लोव्हज् असे सर्व साहित्य माझ्याकडे आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे सीझनचा चेंडू गेली २५ वर्षे माझ्या शोकेसमध्ये आहे. रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर हे अलिबागचे असल्याने क्रिकेटविषयी मनात पहिल्यापासूनच एक अभिमानाची भावना होती. कारण माझंही गाव अलिबाग आहे. समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळणे हा वेगळाच अनुभव आहे. बालपणी खूप क्रिकेट खेळलोच. पण महाविद्यालयात असताना आम्ही सर्व मित्र न चुकता दर रविवारी समुद्रकिनारी जाऊन क्रिकेट खेळायचो. महाराष्ट्रातील सेलेब्रिटी लीगचाही मी भाग होतो. १९८३च्या विश्वचषकात भारताचा झालेला अविस्मरणीय विजय आजही मला आठवतो. यंदाचा विश्वचषक मी माझ्या अलिबागच्या घरी माझ्या कुटुंबीयांसोबत पाहात आहे. भारताची कामगिरी पाहता, यंदाच्या विश्वचषकातही भारताचे नाव कोरले जाईल, असा विश्वास आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा लवकर पूर्ण व्हावी, अशी आशा आहे.
(शब्दांकन : नीलेश अडसूळ)