वृत्तसंस्था, काठमांडू

नेपाळमध्ये ‘जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरूप धारण केल्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. निदर्शकांचा संताप इतका अधिक होता की, त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने निदर्शकांना शांततेचे आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले. दरम्यान, भारताने नेपाळमधील आपल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

देशासमोरील अभूतपूर्व परिस्थिती विचारात घेऊन आपण राजीनामा देत आहोत असे ओली यांनी अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. सोमवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला आणि किमान ३०० जण जखमी झाले. शासनाने कठोरपणे निदर्शने हाताळल्यामुळे संतप्त निदर्शकांनी मंगळवारीही निदर्शने सुरू ठेवली. प्रशासनाने लागू केलेली संचारबंदी आणि मोठ्या प्रमाणात तैनात सुरक्षा व्यवस्था निदर्शकांना अडवू शकली नाही. काहीच वेळात निदर्शनांचे लोण संपूर्ण देशभरात पसरले.

समाजमाध्यमांवरील बंदी हे तरुणांच्या संतापाचे तात्कालिक कारण ठरले असले तरी, त्याच्या जोडीला मोठ्या प्रमाणात पसरलेला भ्रष्टाचार, त्याविरोधात सरकारची निष्क्रियता आणि घराणेशाही यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष असल्याचे समोर येत आहे.

नेत्यांच्या मालमत्ता लक्ष्य

ओली यांनी राजीनामा दिल्यानंतरही निदर्शकांचा संताप शमला नाही. त्यांनी बालकोट येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल, माजी पंतप्रधान शेरबहादूर देउबा, दूरसंचारमंत्री पृथ्वी सुब्ब गुरुंग आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांसारख्या विविध नेत्यांच्या खासगी मालमत्तांना लक्ष्य केले. या वेळी निदर्शकांनी देउबा आणि त्यांची पत्नी अर्झु रार्णा यांना त्यांच्या घरातून पकडल्याची दृश्ये समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. या झटापटीत दोघांनाही किरकोळ इजा झाली.

आम्ही सुरुवातीपासून हे स्पष्ट केले आहे – ही केवळ जेन-झी चळवळ आहे. प्रिय जेन-झी, तुमच्या दमनकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आता कृपया शांतता राखा. – बालेन शहा, महापौर, काठमांडू बुलेट्स

विमानसेवेवर परिणाम

– काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद

– एअर इंडियाकडून दिल्ली आणि काठमांडूदरम्यानच्या चार विमानसेवा रद्द

– इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सकडूनही दिल्ली

– काठमांडू विमानसेवा रद्द