Chhangur Baba: उत्तर प्रदेशमधील स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबानं हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मुस्लीम तरूणांची फौज तयार केली होती, अशी बातमी इंडिया टुडेने टीव्हीने दिली आहे. उत्तर प्रदेशने एटीएसकडून छांगूर बाबाला नुकतीच अटक झाली आहे. मुस्लीम देशांमधून छांगूर बाबाला ५०० कोटींचा निधी मिळाला असल्याचा आरोप करण्यात येत असून याची चौकशी करण्यात येत आहे. गरीब, विधवा आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य करत त्यांच्या धर्मांतराचे रॅकेट छांगूर बाबांकडून चालवले जात होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगूर बाबा भारत-नेपाळ सीमेवरून उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांमधील मुस्लीम पुरूषांना पैसे पाठवत होता. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू मुलींना आमिष दाखविणाऱ्या मुस्लीम पुरूषांनाही त्याच्याकडून रोख रक्कम दिली जात होती, असेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
छांगूर बाबाची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिलाही एटीएसने ताब्यात घेतले असून सात दिवसांची एटीएस कोठडीत पाठविण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशातून मिळणाऱ्या निधीचे व्यवस्थापन नीतू करत होती.
गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी छांगूर बाबाला मिळणाऱ्या विदेशी निधीचे मार्ग आणि दुवे उघड करण्यासाठी या दोघांची चौकशी करणार आहेत. नवीन उर्फ जमालुद्दीन आणि छांगूर बाबाचा मुलगा मेहबूब यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. ते सध्या लखनऊ जिल्हा तुरुंगात आहेत.
स्पेशल ५० टास्क फोर्स तयार केल्याचा आरोप
मनीकंट्रोल हिंदीने दिलेल्या बातमीनुसार, छांगूर बाबाच्या आलिशान हवेलीत ५० तरूण राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या तरूणांना सर्व सुखसोयी पुरविल्या जात होत्या. स्वतःला धर्मगुरू म्हणविणाऱ्या छांगूर बाबाने या तरूणांना आध्यात्मिक सेवक असे नाव दिले होते. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी या तरूणांना प्रशिक्षण देऊन वापर केला जात असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथील छांगूर बाबाच्या हवेलीवर एटीएसने मागच्या आठवड्यात हातोडा फिरवला. तसेच त्याच्याशी संबंधित इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.