संशयित नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील कंकेर जिल्ह्य़ात रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तीन वाहने पेटवून दिली, असे पोलिसांनी सांगितले. रोड रोलर, टँकर व जेसीबी मशीन त्यांनी पेटवले. ही वाहने कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती. पारलकोट खेडे क्रम ८४ व ८५ या छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर ही घटना काल रात्री उशिरा घडल्याचे पोलीस अधीक्षक आर.एन.दाश यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १२ नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली असे सांगून ते म्हणाले की, कामगारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर तिथे पोलीस कुमक पाठवण्यात आली होती. या खेडय़ातील ग्रामस्थांनी अलीकडेच एक सभा घेऊन कंत्राटदारांना पावसाळ्यापूर्वी रस्ता करून देण्यास सांगितले होते. पोलिसांना न सांगताच कंत्राटदाराने काम सुरू केले पण त्याचा परिणाम विपरित झाला. शेजारच्या महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांना रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे समजताच त्यांनी हे विकासाचे काम उधळून लावण्याचे ठरवले होते, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.