पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रात चीनने ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न भारताला करता येणार नाही. तांत्रिक कारणांचा आधार घेत चीनने भारताच्या प्रयत्नांना खोडा घातला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पठाणकोट हल्ल्यातील मुख्य आरोपी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनकडून संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीनने पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करत हा प्रयत्न हाणून पाडला. याआधी संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचे नाव समाविष्ट करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून फेब्रुवारीत करण्यात आले होते. मात्र त्यावेळीही चीनने खोडा घालत अमेरिकेचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यावेळी चीनने मसूद अजहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतील समावेश तांत्रिक कारणांचा आधार घेत २ ऑगस्टपर्यंत रोखला. मात्र आता या तांत्रिक कारणांमुळे मिळालेल्या मर्यादेचा कालावधी चीनकडून वाढवण्यात आला आहे.

चीनने पुन्हा एकदा तांत्रिक कारणांचा वापर केला नसता, तर संयुक्त राष्ट्राकडून मसूद अजहरचे नाव आपोआप आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असते. मात्र चीनने तांत्रिक कारणांमुळे मिळालेला अवधी संपण्याच्या अगदी काही तासांआधी हालचाली केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा चीनने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत जाण्यापासून वाचवले आहे. त्यामुळे पुढील तीन महिने मसूद अजहरच्या नावाचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत केला जाणार नाही.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विशेष म्हणजे नकाराधिकार असल्याने चीनचे आतापर्यंतचे प्रयत्न यशस्वीदेखील ठरले आहेत. मागील वर्षी १५ देशांचे सदस्य असलेल्या या परिषदेत चीन या एकमेव देशाने भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. उर्वरित सर्व १४ देशांनी भारताच्या बाजूने कौल दिला होता. मसूद अजहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश झाल्यास त्याच्या सर्व संपत्तीवर टाच आणली जाईल. यासोबतच त्याच्या प्रवासावरदेखील बंदी येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China again blocks proposal to designate jaish chief masood azhar as global terrorist